Haryana cabinet : मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्याकडे गृह, वित्त…

चंदिगढ –हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी नव्या मंत्र्यांना खातेवाटप केले. स्वत: सैनी तब्बल १२ खात्यांची धुरा सांभाळणार आहेत. त्यामध्ये गृह आणि अर्थ या महत्वाच्या खात्यांचाही समावेश आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने हरियाणाची सत्ता राखली. त्या यशानंतर पक्षाने सैनी यांना मुख्यमंत्रिपदी कायम ठेवले.
सैनी आणि १३ मंत्र्यांचा नुकताच शपथविधी झाला. त्यानंतर पुन्हा हरियाणाचा कारभार पाहण्यासाठी सज्ज झालेल्या सैनी यांनी खातेवाटप केले. ज्येष्ठ मंत्री अनिल विज यांच्याकडे ऊर्जा आणि परिवहन खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागील कार्यकाळात ते गृह आणि आरोग्य खात्यांची जबाबदारी सांभाळत होते. आता आरोग्य मंत्री म्हणून आरती सिंह राव कार्य करतील.
विपुल गोयल यांच्याकडे महसूल, तर राव नरबीरसिंह यांच्याकडे उद्योग आणि वाणिज्य खाती असतील. श्रुती चौधरी महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून कार्य करतील. मागील कार्यकाळात सैनी यांना मुख्यमंत्री म्हणून काही महिनेच कार्य करता आले. आता नव्या कार्यकाळात त्यांच्यासमोर मुख्यमंत्री म्हणून प्रभावी कार्य करण्याचे आव्हान असेल.





