पिंपरी | मावळ तालुक्यात भात पीक कापणीला

लोणावळा, (वार्ताहर) – यंदा मावळ तालुक्यासह संपूर्ण राज्यभर वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली. मावळ तालुक्यातील पवन मावळ, आंदर मावळ व नाणे मावळ परिसरातील भात पिके यामुळे दमदार आली असून भाताच्या लोंब्या डोलू लागल्या आहेत. तर काही ठिकाणी भात पीक कापणीला आले आहे.
येत्या आठवडाभरात तयार झालेल्या भात पिकाच्या कापणीची सुरुवात होईल. पुरेसा पाऊस आणि दमदार आलेले भात पीक यामुळे यंदा शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
पिकाला गरज असताना वेळोवेळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे पोषक वातावरण तयार होऊन खरीप भात पीक चांगले बहरले आहे. यामुळे यंदा भाताचे चांगले उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
यावर्षी देशातील इतर काही राज्यांसह महाराष्ट्रात मुबलक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार सर्वत्र दमदार पाऊस पडला. मावळातही २१९ टक्के पाऊस झाला.
तसेच मागील दोन आठवड्यात तालुक्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती. परतीचा हलका पाऊस हा भात पिकासाठी पोषक असतो, त्यामुळे खरीप भाताचे पीक चांगले वाढले आहे.
दिवाळीच्या तोंडावर कापणीला सुरूवात
मावळात यंदा ९५ टक्के शेतकऱ्यांनी इंद्रायणी वाणाची लागवड केली आहे. तर भाताच्या इतर वाणांचीही थोड्याफार प्रमाणात लागवड झाली आहे. सध्या जवळपास सर्वच ठिकाणचे भात पीक पोटरीवर आले असून काही ठिकाणी पिके थेट कापणीला आली आहेत.
साधारणतः दिवाळीच्या तोंडावर भात कापणीला सुरुवात होते. भाताची कापणी, झोडपणी, मळणी असे अनेक टप्पे असतात. येत्या दहा पंधरा दिवसांत गावोगावी भात कापणी सुरु झालेली दिसेल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.





