मुंबई : भाजपकडून सत्तारूढ महायुतीमधील मित्रपक्षांचीच कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कॉंग्रेस नेत्यांना प्रवेश देण्यामागे भाजपचा तोच राजकीय डाव आहे, असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तो महायुतीच्या गोटातील अस्वस्थता वाढवणारा आहे. राज्यात मागील वर्षी विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये घवघवीत यश मिळवत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचा समावेश असणाऱ्या महायुतीने सत्ता राखली. तर, विरोधकांच्या महाविकास आघाडीची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. त्यानंतर कॉंग्रेसमधून आऊटगोईंगचे सत्र सुरू झाले आहे. त्या पक्षाचा हात सोडून काही माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांच्या पक्षबदलाने कॉंग्रेस पक्ष विचलित झाला नसल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न सपकाळ यांनी केला. उलट, महायुतीमध्ये राजकीय वर्चस्वासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे अप्रत्यक्षपणे सुचवणारे विश्लेषण त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना केले. शिंदेसेना आणि अजित पवार पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवलेल्या मतदारसंघांमधील कॉंग्रेस नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले. त्यातून भाजप महायुतीमध्येच राजकीय खेळ करत असल्याचे दिसते. तो पक्ष रेडीमेड नेत्यांना सामावून घेत आहे. सर्वांत मोठा पक्ष असल्याचा दावा भाजपकडून केला जातो. मग, इतर पक्षांच्या नेत्यांना सामावून घेण्याची गरज का भासते? भाजप स्वत:च्या नेत्यांना सक्षम का बनवू शकत नाही? त्यातून तो पक्ष कमजोर असल्याचे स्पष्ट होते. भाजपने कॉंग्रेसमुक्त भारताचे उद्दिष्ट पुढे केले होते. मात्र, त्या पक्षाचे रूपांतर आता कॉंग्रेसयुक्त पक्षात झाले आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली. कॉंग्रेस सोडून गेलेले नेते सत्तालोभी होते. त्यांच्यासाठी आपले दरवाजे बंद करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पक्षांतर केलेले अनेक वर्षे आमदार पदावर होते. आता त्यांची प्रतीक्षा करण्याची तयारी नाही. मात्र, आमच्याकडे संबंधित मतदारसंघांमध्ये पक्षाची फेररचना करण्यासाठी भरपूर वेळ आहे. पक्षांतर केलेल्यांमुळे कॉंग्रेस संघटना मजबूत करण्याच्या आमच्या इराद्यावर कुठलाही परिणाम झालेला नाही. महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कॉंग्रेस सज्ज होत आहे, अशी स्पष्टोक्ती सपकाळ यांनी केली.