प्रभात वृत्तसेवा पुणे : वोट चोरी हे देशातील विदारक सत्य असून लोकशाही संपुष्टात आणण्याचा भाजपाचा हा कुटील डाव असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. लोकांचा एकमताचा अधिकार हिरावून घेणे म्हणजे नागरिकांना घटनेने दिलेल्या सर्वोच्च शक्तीचा अपमान असल्याचेही ते म्हणाले. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा–कर्तव्य – त्याग सप्ताहानिमित्त लोकशाहीची हत्या- वोट चोरीचे विदारक सत्य या बालगंधर्व कलादालनातील प्रदर्शनाला सपकाळ यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. या सप्ताहाचे संयोजक आणि प्रदर्शनाचे मार्गदर्शक, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष आमदार मोहन जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रदर्शनाचे आयोजक प्रथमेश आबनावे यांचेही भाषण झाले. माजी नगरसेवक अविनाश बागवे, सुनील मलके, लता राजगुरू, प्रदेश सरचिटणीस प्रशांत सुरसे, ॲड. शाबीर शेख, इंटक अध्यक्ष चेतन अग्रवाल तसेच अनेक आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आभार प्रदर्शन सुनील मलके यांनी केले.