रेडा – पुणे येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि. 17) सदिच्छा भेट घेतली. राजभवनमध्ये झालेल्या या भेटीप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील उपस्थित होत्या.
यावेळी चर्चेत राज्यपाल कोश्यारी यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयांवर संवाद साधला. राज्यपाल कोश्यारी यांना प्रशासनाचा व राजकारणाचा असलेला प्रदीर्घ अनुभव याप्रसंगी जाणवला, असे पाटील यांनी सांगितले. युवा पिढीने राजकारणात सक्रिय होऊन जनसेवा करावी, यासाठी ते आग्रही दिसले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सकारात्मक विचारांची मोठी शिदोरी असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
यावेळी चर्चेमध्ये जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनीही सहभाग घेतला. राज्यपालांशी झालेल्या भेटीमुळे अधिक जिद्दीने काम करण्यासाठी विचारांची नवीन ऊर्जा मिळाल्याचे अंकिता पाटील यांनी नमूद केले.