चेन्नई – भारताचा ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळपटू पेंडल्या हरिकृष्णा याने ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले आहे. करोनाचा धोका कायम असल्याने गेल्या महिन्यापासून जगभरात ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा घेतल्या जात असून त्यात हरिकृष्णा याच्यासह अनेक खेळाडूंनी आगामी स्पर्धांसाठी उपयुक्त सराव केला आहे.
पहिल्या फेरीपासून हरिकृष्णाने सातत्यपूर्ण खेळ केला. मात्र, त्याला पोलंडच्या ग्रॅण्डमास्टर रॅडोस्लाव्ह वोतास्झेकविरुद्ध पराभव मान्य करावा लागला. हरिकृष्णाने 6.5 गुणांच्या जोरावर उपविजेतेपद प्राप्त केले.
रॅडोस्लाव्हने निर्णायक फेरीत जरी आघाडी घेतली असली तरीही अझरबैजानच्या शाक्रीयार मेमेदेरोव्ह याने 7.5 गुणांसह या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. त्याने रॅपिड फेरीतही आगेकूच राखली व एकूण 10 फेरींच्या सामन्यांनंतर त्याने या स्पर्धेवर वर्चस्व राखले. त्याने डबल राऊंडमध्ये (परतीचे सामने) देखील सरस खेळ करताना हरिकृष्णाला गुणतालिकेत मागे टाकले.
या स्पर्धेच्या विजेतेपदाबद्दल शाक्रीयारला 3 हजार अमेरिकन डॉलर्सचे पारितोषिक मिळाले तर, हरिकृष्णाला 2 हजार 250 अमेरिकन डॉलर्सचे पारितोषिक देण्यात आले. रॅडोस्लाव्ह याला तिसरे स्थान मिळाले.
स्पर्धा सुरू झाल्यानंतर हरिकृष्णाने सातत्याने सरस खेळ केला. मात्र, निर्णायक फेरीत त्याला आघाडी घेता आली नाही. त्याला स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत आवश्यक गुणांची कमाई करता आली नाही तसेच आठव्या फेरीतही त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे अंतिम गुणतालिकेत त्याला पिछाडीवर राहावे लागले.
पांढऱ्या मोहरांनी खेळ सुरू करणारा हरिकृष्णा उपविजेता ठरला असला तरीही आगामी काळातील स्पर्धेसाठी चांगला सराव मिळाल्याचे त्याने सांगितले. करोनाचा धोका वाढू लागल्याने जगभरातील मानाच्या बुद्धिबळ स्पर्धा एक तर रद्द झाल्या किंवा स्थगित कराव्या लागल्या आहेत. अशा स्थितीत अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू गेले दोन महिने ऑनलाइन स्पर्धा खेळत आहेत.
प्रतिष्ठित स्पर्धा होण्याची शक्यता
ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा जरी सध्या खेळाडूंना खेळाव्या लागत असल्या तरी येत्या महिनाभरात करोनाबाबतचे सर्व सुरक्षेचे उपाय पाळून जगभरातील प्रतिष्ठेच्या स्पर्धा सुरू होण्याचे संकेत जागतिक बुद्धिबळ महासंघाने दिले आहेत. करोनाचा धोका काही देशांत कमी झाला आहे. अशा स्थितीत आगामी काही दिवसांत परिस्थितीचा आढावा घेत याबाबत निर्णय घेतला जाईल.