याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार
नवी दिल्ली – कॉंग्रेस मध्ये नव्यानेच दाखल झालेले पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी त्यांच्या वरील एका खटल्याच्या निकाला स्थगिती मागणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात केला आहे आणि त्यावर त्वरीत निर्णय घेण्याची मागणी त्यांनी सुप्रिम कोर्टाकडे केली आहे पण तशी तातडीची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पटेल हे गुजरात मधील जामनगर मतदार संघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक असून त्यादृष्टीने त्यांनी या खटल्यावर त्वरीत सुनावणी घेऊन स्थगिती देण्याची मागणी केली होती. पण त्या तातडीची गरज काय? असा सवाल करीत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मागणी अमान्य केली आहे.
जामनगर मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल अशी असून त्यामुळे हार्दिक पटेल यांच्या उमेदवारीपुढे अडचण निर्माण झाली आहे. हार्दिक पटेल यांना सन 2015 सालच्या विसपुर दंगल प्रकरणात ट्रायल कोर्टाने दोषी ठरवले आहे. त्या निर्णयावर स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाने नकार दिल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.