नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल विवादास्पद वक्तव्य केले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले लोकपाल या प्रकरणाची चौकशी करत आहेत. लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी. के. जैन यांनी पांड्या व राहुल यांना नोटीस बजावली आहे.
प्रशासकीय समितीनेही पांड्या व राहुल यांना तात्पुरते निलंबित केले होते. पण, लोकपाल यांच्याकडून निकाल येण्यापूर्वी ती बंदी उठवण्यात आली होती. न्यायाधीश जैन यांनी सांगितले की, हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांना साक्ष देण्यासाठी मागील आठवड्यात नोटीस पाठवली आहे. मात्र, यासंदर्भात बीसीसीआयनं पांड्या व राहुल यांच्याशी चर्चा केली की नाही, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. नियमानुसार मला त्यांचीही बाजू ऐकावी लागणार. आता साक्ष द्यायला कधी यायचे याचा निर्णय त्यांनी घ्यावा, असेही जैन यांनी स्पष्ट केले.