Hapus Mango Price – अक्षय्य तृतीयेनंतर दुसऱ्या टप्प्यात कच्च्या हापूस आंब्याची आवक वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे पिकण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे आंब्याच्या दरात निम्म्याने घसरण झाली आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात पाच दिवसांपूर्वी दर्जानुसार तयार डझनास मिळणारा ८०० ते १ हजार ५०० रुपये भाव आता ५०० ते ८०० रु रुपयांवर आला आहे. वाढलेल्या पुरवठ्यामुळे आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. यंदा लहरी हवामानामुळे आंब्याच्या पहिल्या टप्प्यातील उत्पादनावर विपरित परिणाम होऊन अपेक्षित आवक होताना दिसत नव्हती. त्यामुळे, घाऊकसह किरकोळ बाजारात आंब्याचे दर चढेच होते. कोकणपट्ट्यातून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात दररोज जवळपास दहा हजार पेट्या तर कर्नाटकातून दोन ते अडीच हजार पेट्या आंबा दाखल होत होता. मात्र, अक्षय्य तृतीयेनंतर कोकणातील देवगड, संगमेश्वर, पावस, राजापूर, सावंतवाडी आदी भागातून हापूस आंब्याची आवक दुपटीने वाढली आहे. त्यात उष्णतेमुळे परिपक्व होण्याची प्रक्रियाही वाढीला लागल्याने स्वस्त आणि मुबलक प्रमाणात आंबा बाजारात उपलब्ध असल्याने खरेदीदारांनीही हापूसच्या खरेदीस सुरवात केल्याचे चित्र आहे. “कोकणातून मोठ्या प्रमाणात हापूसची आवक होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे आंबा लवकर पिकत आहे. माल अधिक प्रमाणात उपलब्ध असल्याने भावात घट झाली आहे. पुढील काही दिवसांत आवक अशीच राहिल्यास भाव स्थिर राहतील.” – युवराज काची, हापूस आंब्याचे व्यापारी, मार्केट यार्ड.