शिंदोडीसारख्या छोट्या गावाला कोट्यावधींचा निधी देता आला याचा आनंद – सुजाता पवार

निमोणे : सन २००९ पासुन तुम्ही सर्वांनी अशोक पवार यांच्यावर जे प्रेम केल त्यातुन उतराई होण्याचं भाग्य आम्हाला लाभले. आपल्या शिरुर-हवेली मतदार संघाची रचना जर पाहिली तर ती मोठया प्रमाणात विस्तृत असल्याने काही ठिकाणी निधी कमी जास्त झाला असेल पण अशोक पवार यांनी सगळ्या गावांना थोड्याफार प्रमाणात का होईना निधी देण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या माजी सभापती तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार यांनी केले.
शिंदोडी ते निमोणे या आमदार अॅड.अशोक पवार यांच्या फंडातुन झालेल्या आठ कोटी रुपयांच्या रस्त्याचे उदघाटन बुधवार (दि ९) रोजी सुजाता पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, विकासनिधी टाकत असताना सर्वसामान्य आणि सर्वसमावेशक घटकांच्या हिताचा विचार करुन हा निधी टाकला जातो. तुम्ही रावसाहेब दादांवर प्रेम केलं तसंच बापूंवर पण प्रेम केलं.
त्यामुळेच तुमच्या पाठिंब्यावर पुणे जिल्ह्यातुन एकमेव निष्ठावंत आमदार म्हणुन बापु पवार साहेबांच्या सोबत कठीण काळात उभे राहिले. आपल्या पुणे जिल्ह्यातुन एकमेव खासदार डॉ अमोल कोल्हे आणि एकमेव आमदार अॅड.अशोक पवार हे संकटाच्या काळात पवार साहेबांसोबत ठामपणे उभे राहिले याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान असल्याचेही यावेळी सुजाता पवार यांनी सांगितले.
यावेळी शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुर तालुका कार्याध्यक्ष विजय भोस यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष एकनाथ वाळुंज, बलभीम वाळुंज, शिवाजी वाळुंज, सुनिल वाळुंज, भगवंत वाळुंज, विठ्ठलराव वाळुंज, निमोणे गावचे माजी सरपंच दिलीप काळे, युवा कार्यकर्ते मोहन वाळुंज, शिवाजी ओव्हाळ, कृष्णा माने, सुरज वाळुंज, जनार्दन होले, प्रकाश ओव्हाळ तसेच मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या.





