एम. डी. पाखरे/ज्ञानेश्वर फड आळंदी – ज्ञानेश्वरापाशीं आनंदी आनंद । नाचतो गोविंद कीर्तनासी ॥ दशमीच्या दिवशीं महोत्सव आळंकापुरीं । करितसे हरि आवडीनें ॥ हरिदिनीं जागरण होत सारी रात्र । बसोनि पंढरीनाथ स्वयें अंगे ॥ द्वादशी पुण्यतिथी केली ज्ञानेश्वरा । पांच दिवस सारा महोत्सव ॥ अमावस्ये दिवशीं केला गोपाळकाला । मग वैष्णवाला लाभ मोठा॥ नामा म्हणे देवा आनंद आळंकापुरी । कांही दिवस हरि राहा येथें ॥ संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समकालीन संत नामदेव महाराज यांच्या अभंगानुसार संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्यासाठी देव, संत आळंदीला आले होते. त्यानुसार परंपरेप्रमाणे पंढपूर येथून श्री पांडुरंगराय, संत नामदेव, भक्त पुंडलिक यांचे पालखी सोहळे आळंदीत पोहोचले आहेत. तसेच राज्याच्या कानकोपर्यातून वारकरी दिंड्या आळंदीत पोहोचत आहेत. आळंदीत पोहोचल्यावर दिंडी वारकरी नगरप्रदक्षिणा करताना दिसत असून इंद्रायणी घाट, प्रकाक्षिणा रस्तावर खांद्यावर पताका, गळ्यात टाळ, वीणा, पखवाज, महिलांच्या डोक्यावर तुळसीवृंदावन असे चित्र दिसत असून ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष दिवसभर ऐकू येत आहे. शनिवारी (दि. 23) श्रीगुरु हैबातबाबा यांच्या पायरी पूजनाने माऊलींचा कार्तिकी एकादशी वारी आणि 728वा संजीवन समाधी सोहळा सुरू झाला आहे. उद्या मंगळवारी (दि. 26) कार्तिकी एकादशी तर गुरुवारी (दि. 28) समाधी सोहळा संपन्न होणार आहे. मंदिर सजावटीची लगबग कार्तिकी एकादशीनिमित्त माऊली मंदिर देऊळवाड्यात गणपती मंदिर, मुक्ताई मंदिर परिसरात दिवसभर मंदिर सजावट सुरू होती. झेंडू, गुलाब, गुलछडी अश्या रंगी बेरंगी आकर्षक फुल सजावट करण्यात येत आहे. तसेच मंदिराला चोहीबाजूनी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलीय. रात्रीच्या वेळी मनमोहन असे दृश्य दिसत आहे. दिंड्यांची नगरप्रदक्षिणा राज्याच्या कानकोपर्यातून निघालेल्या दिंड्या गेली दोन दिवसांपासून आळंदीत पोहोचत आहेत. आज दशमीच्या दिवशीही अनेक वारकरी दिंड्या आळंदीत पोहोचल्या. येथे आल्यानंतर सर्व दिंड्या नगरप्रदक्षिणा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार आळंदीत दाखल होताच प्रदक्षिणा करून वारकरी आपापल्या मुक्कामी पोहोचत होते. भाविकांची संख्या रात्रीत वाढली आळंदीचा हा कार्तिकी वारी आणि समाधी सोहळा हा अष्टमीपासून सुरू होतो. मुख्य यात्रा वारी एकादशीला असते. तर दोन दिवसानंतर समाधी सोहळा असतो. अमावस्यापर्यंत म्हणजेच सात दिवस हा सोहळा असतो. मात्र बहुतांश भाविक हे दशमी ते समाधी सोहळा असे 4 दिवस तर अनेक भाविक हे केवळ एकादशी दिवशी आळंदीला येतात आणि द्वादशीचे भोजन करून परततात. त्यामुळे दशमीच्या रात्री मोठ्या संख्येने भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. दर्शनबारी घाटपलीकडील मंडपात लाखों वारकरी आता आळंदीत पोहोचले आहेत. आळंदीत आल्यावर इंद्रायणी नदीचे स्नान आणि माऊलींच्या समाधीचे दर्शन वारकरी घेतात. त्यामुळे दर्शनबारी इंद्रायणी घाटाच्या मागे उभारण्यात आलेल्या मंडपात पोहोचली आहे. आठ तासाहून अधिक वेळ लागत असल्याचे भाविकांनी सांगितले. दर्शनबारीत खूप वेळ उभे राहावे लागत असल्याने येथे त्यांना अल्पआहार आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इंद्रायणी घाट गजबजला – घाटावर विश्वशांती केंद्र येथे सुरू असलेला हरिनाम सप्ताह, दिंडी प्रदक्षिणा, आणि रात्री मुक्कामी असणारे भाविक यामुळे इंद्रायणी घाट परिसर चोवीस तास गजबजलेला आहे. दिवसभर येथे मोठ्या प्रमाणात भाविक असून वासुदेव गोड आवाजात अभंग गात आहेत. आळंदी पंचक्रोशीत हरिनामाचा गजर हरिनाम सप्ताहात पहाटे काकड्याच्या कार्यक्रमपासून सुरुवात होते. नंतर ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिकथा, हरिपाठ, कीर्तन आणि रात्री जागर असे दिवसभर आणि रात्रीही कार्यक्रम होत असल्याने आळंदी पंचक्रोशीत हरिनामाचा गजर सुरू आहे. आज माऊली मंदिरात होणारे कार्यक्रम – कार्तिक वद्य भागवत एकादशी मंगळवार दि. 26 नोव्हेंबर (कार्तिकी एकादशी यात्रा) रात्री 12:30 ते पहाटे 2 – 11 ब्रम्हवृंदांच्या वेद घोषात पवमान अभिषेक व दुधारती, दुपारी 12 ते 12:30 महानैवेद्य, दुपारी 1 वाजता श्रींची नगर प्रदक्षिणा, रात्री 8:30 धुपारती, रात्री 12 ते 2 श्री मोझे यांचेतर्फे जागर.