बॉलीवूडमधील आघाडीचा आणि लोकप्रिय चित्रपट निर्माता म्हणून करण जोहर ओळखला जातो. आज 25 मे रोजी करणचा 48वा वाढदिवस आहे. लॉकडाऊनमुळे यंदाचा वाढदिवस करणने कुटुंबीयांसोबत साजरा केला आहे. याप्रसंगी सोशल मीडियावर करणला सेलिब्रेटींसह चाहत्यांनी अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
करण जोहरने “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटामध्ये सहाय्यक कलाकार म्हणून काम करत बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्याचे सर्वांना माहित आहे. पण त्यापूर्वी करण जोहरने दूरदर्शन वाहिनीवरील एका मालिकेत बाल कलाकार म्हणून काम केले आहे. करणने 1989 साली दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या इंद्रधनुष्य या मालिकेत बाल कलाकार म्हणून काम केले आहे. या मालिकेसंदर्भात करणने साजिद खान आणि रितेश देशमुखच्या “यारों की बारात’ या शोमध्ये वक्तव्य केले होते.
त्यावेळी त्याने वयाच्या 14व्या वर्षी या मालिकेत बाल कलाकार म्हणून काम केले होते. पण त्यावेळी काही कारणास्तव मालिकेचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. जेव्हा मालिका प्रदर्शित झाली तेव्हा तो 18 वर्षांचा होतो. या मालिकेनंतर त्याने “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात सहाय्यक कलाकार म्हणून काम केले. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.