वडिवळे धरण अर्धे भरलेले!

पाण्याचे ठोस नियोजन हवे : पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक

मावळ –
नाणे मावळातील वडिवळे धरणातून अनेक गावांना तसेच या धरणाचे पाणी इंद्रायणी नदीच्या माध्यमातून अनेक शहरे व गावांपर्यंत पोहचत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाईची चिन्हे दिसत असताना वडिवळे धरण प्रकल्पात मात्र पावसाळ्यापर्यंतचा मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. पाटबंधारे विभागामार्फत धरणाच्या पाणीसाठ्याचे मंजूर प्राथमिक सिंचन आराखड्यानुसार नियोजन केले असल्याने पाणी टंचाईची समस्या उद्‌भवणार नाही, अशी माहिती वडिवळे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.

मावळासह अनेक भागात मार्च महिन्याच्या प्रारंभी उन्हाची तीव्रता मागील वर्षीपेक्षा अधिक वाढू लागल्याने अनेक ठिकाणचे पाणीसाठे कमी होण्याची स्थिती आहे. नाणे मावळातील वडिवळे धरणाचा मंगळवारपर्यंत (दि. 2) 54.95 टक्‍के भरलेले असून, या धरणाचा एकूण पाणीसाठा 27.18 दशलक्ष घन मीटर एवढा आहे. त्यातील उपयुक्‍त पाणी साठा 16.70 दशलक्ष घन मीटर इतका आहे. धरणातून मौजे गोवित्री ते देहूपर्यंत कुंडलिका व इंद्रायणी नदीमध्ये पाणी सोडून शेती प्रयोजनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठीचे जुलै महिन्यापर्यंतचे नियोजन असल्याची माहिती खाडे यांनी दिली.
याशिवाय मागणीनुसार, वेळोवेळी शेतीसाठी व पिण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने परिसरातील नद्या तसेच इंद्रायणी नदीच्या पाणी पातळी योग्य असल्याने त्याचा उपयोग नदी किनारी असलेल्या अनेक गावांना होणार आहे. आजूबाजूच्या गावांना मुबलक पाणी व शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळत आहे.

वडिवळे धरणाच्या पाण्यावर नाणे मावळातील महत्वाची गावे गोवित्री, कांब्रे, नाणे या गावांसह कामशेत, कान्हे, वडगाव, तळेगाव, इंदोरी, देहू, निघोजे, चिंबळी, आळंदी, वडगाव शिंदे व तुळापूर आदी महत्वाच्या गावांसह आजूबाजूच्या छोट्या मोठ्या गावांना पिण्याचा पाणी पुरवठा तसेच शेतीच्या सिंचनासाठी फायदा होत आहे. या धरणाच्या पाण्यावर अनेक गावांमधील शेती क्षेत्र सिंचनाखाली येत आहेत. धरणातील पाणीसाठा मुबलक असल्याने इंद्रायणी नदीतीरावरील गावांना तरी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. ऑक्‍टोबर अखेरपर्यंतचे उन्हाळी हंगामाचे पिण्याचे पाणी नियोजन करूनही धरणामध्ये उपयुक्‍त पाणी साठा शिल्लक राहणार असल्याची माहिती धरण प्रशासन अधिकार्यांनी दिली.

विविध गावांच्या व नागरिकांच्या मागणीनुसार वेळोवेळी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने सध्या तरी पाणी टंचाईचा विषय नाही. शिवाय पाटबंधारे विभागाच्या पाणी नियोजनामुळे टंचाई निर्माण होणार नाही. पाटबंधारे विभागामार्फत धरणावर पावसाळ्या पूर्वीच्या हंगामी कामांना सुरुवात झाली आहे. यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने धरणाच्या गेटची तांत्रिक कामे, पावसाळ्या पूवीर्ची देखभाल दुरुस्तीसाठी पाहणी तपासणी, याच प्रमाणे वीज व्यवस्था, धरणाच्या द्वारांची उघडझाप व्यवस्थित होते की नाही, विद्युत मोटार पाहणी, जनरेटर सर्व्हिसिंग, धरणाच्या भरावावरील खालील बाजूचा कचरा गवत साफसफाई, धरणाच्या भरावावरील ड्रेन व्यवस्थित आहेत का याची पाहणी, धरणाच्या गेटला ओईल ग्रीसिंग, रंगरंगोटी आदी कामे सुरू आहेत. या प्रकारच्या विविध उपाययोजनाच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.