Pimpri : केएसबी चौकाजवळ रस्त्यावर अर्धा फूट खोल खड्डा

पिंपरी : चिंचवड स्टेशन ते केएसबी चौक दरम्यान, केएसबी चौक पुलाजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूस सुमारे अर्धा फूट मोठा खोल खड्डा पडला आहे. त्यामुळे विशेषतः दुचाकी वाहनचालकांचे हाल सुरू आहेत. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असतात. त्यामुळे दुचाकीस्वारांना डाव्या बाजूने जावे लागते. त्यामुळे हा खड्डा चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी या भागात अपुरी प्रकाश व्यवस्था असल्यामुळे अपघाताची शक्यता अधिकच वाढली आहे. तसेच दिवसा देखील अचानक खड्डा दिसल्यामुळे तो चुकविताना दुचाकीस्वार गोंधळात पडतात. पावसाळ्यात हा खड्डा पाण्याने भरल्यास वाहनचालकांसाठी तो जिवघेणा ठरू शकतो.
पिंपरी चिंचवड महापालिकेने वेळेवर खड्डा न बुजविल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एखादा अनर्थ घडण्यापूर्वी महापालिकेने त्वरित उपाययोजना करून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.





