पारगाव, – मानवाच्या सौंदर्यातील महत्वाचा घटक म्हणजे त्याचे केस. मग ते कुरुळे असो, सरळ असो किंवा भुरके, असो. प्रत्येकाला आपल्या केसांबद्दल अति प्रेम असते. ते कधीच विरळ होऊ नये अशीच सर्वांची भावना असते. परंतु हल्ली तरुणांना अकाली टक्कल पडू लागल्याने त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बदलती जीवनशैली याला कारणीभूत ठरत आहे.
धावपळीच्या युगात मानसिक स्वास्थ्य नसणे, अनुवंशिकता, हार्मोन्स बदल, बोअरवेलचे पाणी तसेच केसांवर विविध प्रकारचे रासायनिक उत्पादनांचा प्रयोग (कलप) आदी कारणांमुळे तरुणांमध्ये टक्कल पडण्याचे व केस पांढरे होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. शालेय जीवन कुठे पार करतो ना तोच केस पांढरे होऊ लागले आहेत. वयाच्या २५ च्या आसपास डोक्यावरील केस विरळ होऊन टक्कल पडू लागले आहे. कपाळ मोठे होत चालले आहे.
नोकरीच्या ठिकाणी सुद्धा याची अडचण येत आहे. मुलगा अविवाहित असेल तर तो नाना प्रकारची औषधे, तेल वापरून निदान लग्नापर्यंत तरी डोक्यावरील सौंदर्याचे भूषण कसे टिकवून ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच फायदा घेत अनेक तेल व औषधांच्या बनावट कंपन्या खोट्या जाहिरातीच्या माध्यमातून अशा तरुणांना लक्ष्य करीत आहेत.
विग वापरण्याकडे कल
सध्या माफक दरात पुरुष आणि महिलांच्या केसांचे मिळते जुळते विग तयार करून मिळत असल्याने अनेक लग्नाळू तरुणांनी विग वापरणे चालू केले आहे. सहसा ते ओळखू येत नाही. यामुळे निदान काहीअंशी अडचण तरी दूर होत आहे. परंतु अकाली टक्कल पडण्यामुळे तरुणाई अस्वस्थ झाली आहे, हे मात्र नक्की.