आळेफाटा : गेल्या काही दिवसांपासून अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्याने बेल्हे, आळेफाटा आणि जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिक त्रस्त झाले होते. दुपारपर्यंत रस्त्यांवर शुकशुकाट, घरात उकाड्याने हैराण नागरिक आणि शेतात उन्हाने करपणारी पिके.. अशा वातावरणात शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी अचानक निसर्गाने ‘कूच बदलली’ आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने परिसराला झोडपून काढले. सायंकाळी चारच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. काही क्षणात वाऱ्याचा वेग वाढला, विजांचा कडकडाट सुरू झाला आणि मुसळधार पावसासह गारपिटीने परिसर व्यापून टाकला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने मोठा दिलासा दिला. मात्र दुसरीकडे शेतकरी आणि व्यापारी वर्गासाठी हा पाऊस डोकेदुखी ठरला. शेतामध्ये काढून ठेवलेला कांदा, भाजीपाला आणि इतर माल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः धावपळ सुरू झाली. अनेक ठिकाणी कांदा पावसात भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच बाजारभावाने रडवलेल्या शेतकऱ्यांना आता पावसाने आणखी एक जबर धक्का दिला आहे. “आधी बाजारभावाने रडवलं.. आता वरूणराजाही रडवतोय,” अशी हतबल प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वादळी वाऱ्यामुळे काही भागांत झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. धुळीचे लोट उडाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दुचाकीस्वारांनी आसरा शोधण्यासाठी धावाधाव केली, तर काही भागांत विजेचा लपंडाव अनुभवायला मिळाला. अचानक बदललेल्या वातावरणाने संपूर्ण परिसर काही काळ स्तब्ध झाला होता. दिवसभर तापलेल्या वातावरणाने सायंकाळी घेतलेली ही अचानक कलाटणी म्हणजे निसर्गाचा अनपेक्षित खेळच, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. हेही वाचा : Pune District : भीमाशंकर विकास आराखड्यावरून राजकारण तापले