गाडीतळ पीएमपीएमएल बस थांबा मैदानात दिली उठाबश्याची शिक्षा! हडपसर : हडपसर उपनगरात दुसऱ्या टप्यातील लॉकडाऊननंतर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्याची संख्या अचानकपणे वाढली. सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ च्या नावाखाली अनेक लोक बाहेर पडण्याचा मार्ग शोधतात. यात सिरम कंपनी रोड, ग्लायडींग सेंटर मैदान या भागातील नागरिकाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर आज सकाळी हडपसर पोलिसांनी धडक मोहीम राबवत या लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटे व सकाळपासून जो माणूस मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावर आला अशा ४८ व्यक्तींना हडपसर पोलीस ठाण्याशेजारील गाडीतळ बस थांब्यावर असलेल्या मोकळ्या जागेत आणून त्याच्यावर कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले . मॉर्निंग वॉकला आलेल्या या लोकांना उठाबश्या ही काढाव्या लागल्या. ज्येष्ठ नागरिक आणि तरुण यात दिसत होते. लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही अतिशय बेजबाबदारपणे काही नागरिक अद्यापही वागत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन वारंवार प्रशासन करत आहेत, मात्र काही महाभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा कारवाईला सामोरे जावे लागत आहे असेच चित्र पाहायला मिळते आहे. लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही मॉर्निंग वॉक करणाऱ्या ४८ जणांवर हडपसर पोलिसांनी कारवाई केली आहे. ग्लायडींग सेंटर व सिरम कंपनी परिसरात सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉक करताना या व्यक्ती आढळून आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. यानंतरही अनेकजण कायद्याचे उल्लंघन करून मॉर्निंग वॉक करत आहेत. त्यांच्यावर कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी घरातच राहणे आवश्यक असल्याने लॉकडाऊन चे आदेश असे पर्यंत अत्यावश्यक कारणाव्यतिरिक घराबाहेर न निघण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी केले आहे. हडपसर गाडीतळ : संचारबंदी असतानाही मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडलेल्या ४८ जणांवर हडपसर पोलिसांनी गुन्हे दाखल केले दरम्यान त्यांना उठाबश्या काढाव्या लागल्या.