Hadapsar Bomb Case – हडपसरमध्ये उषाकिरण रुग्णालयात सापडलेल्या बॉम्बमागचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दहशतवादी कटाचा संशय व्यक्त होत असतानाच, हा संपूर्ण प्रकार आर्थिक विवंचना, गंभीर आजार आणि खंडणी उकळण्याच्या प्रयत्न यातून घडला आहे. याप्रकरणी दहशतवाद विरोधीपथकाने नागपूर रेल्वे स्थानक परिसरात शिवाजी राठोड (२९, रा. मांजरी, मूळ सोलापूर) याला ताब्यात घेतले असून, तो हावडा मार्गे नेपाळला पलायन करण्याच्या तयारीत होता. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गंभीर गुप्त आजाराने त्रस्त होता. काही दिवसांपूर्वी उपचारासाठी तो उषाकिरण रुग्णालयात गेला असता त्याला सात लाखांचा खर्च सांगण्यात आला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याने डॉक्टरांना धमकावून आठ लाख उकळण्याचा मार्ग निवडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या पैशांतून उपचार घेण्याचा त्याचा विचार होता. आरोपी पुन्हा घटनास्थळी धक्कादायक बाब म्हणजे बॉम्ब सापडल्याचा कॉल आल्यावर पोलीस, बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी आले, तेव्हा आरोपी स्वतः तेथे हजर होता. पोलिसांच्या हालचाली, तपासाची दिशा जाणून घेण्यासाठी तो गर्दीत मिसळून सर्व पाहात होता. दरम्यान, तपास आपल्यापर्यंत पोहोचल्याची चाहूल लागताच त्याने गुरुवारी घर सोडले. पोलीस त्याच्या घरी पोहोचण्याच्या अवघ्या पंधरा मिनिटे आधी तो निघून गेला होता. त्यानंतर त्याने मोबाइल बंद केला आणि रेल्वेने हावडा एक्स्प्रेसमार्गे नागपूरकडे प्रस्थान केले. अटक (संग्रहित छायाचित्र) …अखेर जाळ्यात आरोपीच्या कुटुंबीयांकडून तो नेपाळला जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्थानकांवर सतर्कता वाढवली. अकोला आणि मूर्तिजापूर येथे शोधमोहीम राबवली. अखेर नागपूर रेल्वे स्थानक परिसरात त्याचा ठावठिकाणा लागला आणि एटीएसने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे आरोपीच्या मांजरी घरातून जवळपास दोन किलो गांजा जप्त केला आहे. याचा स्वतंत्र गुन्हा दाखल होत आहे. डिजिटल व्यवहाराने मागोवा तपासात पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तोंडाला रुमाल बांधलेला तरुण वारंवार तेथे फिरताना दिसून आला. आरोपीने बॉम्बसदृश वस्तू तयार करण्यासाठी लागणारी चिकटपट्टी शेजारच्या दुकानातून घेतली होती. त्यासाठी त्याने यूपीआय स्कॅनद्वारे १५ रुपयांचे पेमेंट केले होते. याच डिजिटल व्यवहाराने तपासाची दिशा बदलली. डिजिटल घड्याळाच्या कव्हरचा मागोवा घेत आरोपीची ओळख निश्चित झाली. घड्याळाचे कव्हर त्याच्या घरातच सापडले. अवघ्या ४०० रुपयांत डिजिटल घड्याळ, चार पाइप, लाल-काळ्या वायर आणि सेलोटेपच्या सहाय्याने हा कथित बॉम्ब तयार केल्याचे सांगण्यात आले. ऑनलाइन साहित्य मागवून आणि यूट्यूबवरील माहितीच्या आधारे त्याने कथित बॉम्ब तयार केला. त्यामध्ये प्रत्यक्ष स्फोटक होते की नाही, हे फॉरेन्सिक अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.