संगमनेर -लॉकडाऊनदरम्यान लोक सर्वाधिक इंटरनेट वापरत आहेत. मनोरंजनापासून ते गेमिंगपर्यंत इंटरनेटचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे. मात्र सध्या हॅकर्स आपल्याला एसएमएसद्वारे गेमिंग वेबसाईडच्या लिंक पाठवित आहेत. त्याद्वारे संबंधिताची माहिती गोळा करून त्यांचे बॅंक खाते साफ केले जात आहेत. त्यामुळे सायबर सेलद्वारे इंटरनेट वापरणाऱ्यांना अशी माहिती न देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आपण आत्ताच आपल्या खात्यात एक हजार, दोन हजार, पाच हजार किंवा हजार रुपये जमा केले आहेत. ही रक्कम प्राप्त करण्यासाठी आपणास दुसऱ्या संलग्न लिंकवर क्लिक करावे लागेल, असे सांगितले जाते. पैशाच्या लोभापायी अनेक जण या लिंकवर क्लिक करतात, तेव्हा त्यांना त्यांना गेमिंग साइटवर नेले जात आहे. तसेच गेममधील बक्षीस रोख खात्यात हस्तांतरित केले जाईल. त्यासाठी नोंदणी करावी लागेल, असे सांगितले जाते. त्यात बॅंक खात्याचा तपशीलही मागविला जात आहे. ही माहिती दिल्यानंतर आपोआपच आपल्या खात्यावरील पैसे कमी होत असल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. सध्या अशाप्रकारे सायबर हल्लेखोर बक्षिसे देऊन किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करून आकर्षक रकमेचे आमिष दाखवून आपले बॅंक खाते खाली करत आहेत. त्यासाठी सर्वांनीच संबंधित लिंक पाठविलेली वेबसाईट लॉक चिन्हांकित केलेला आहे की नाही, याची तपासणी करावी. लॉक मार्क त्याच्या सुरक्षिततेची हमी देतो. मात्र लोभापायी व अज्ञानामुळे आपण या गोष्टीकडे कानाडोळा करतो व गुन्हेगारांना मोकळे रान मिळते. सायबर हल्ला लक्षात घेता विमा कंपन्यांनीही त्यासाठी संरक्षण देण्यास सुरवात केली आहे. संरक्षण विम्यात आपला डेटा गमावणे, हॅकिंगच्या वेळी व्यवसायातील नुकसान यासारख्या अनेक जोखीम असतात. याअंतर्गत, बहुतेक कंपन्या थर्ड पार्टी विमा संरक्षण प्रदान केले जाते. मात्र हे सर्व पैसे गेल्यावर मनस्ताप करण्याशिवाय पर्याय नसतो. मनस्ताप सहन करण्यापेक्षा खबरदारी घेतलेली बरी. लॉकडाऊनच्या काळात सर्वांत जास्त सोशलसाईटवर होणारी सर्फिंग तुमची डोकेदुखी ठरणार नाही, याची काळजी सर्वांनीच घेणे काळाजी गरज बनली आहे.