Crime News : शिरूर तालुक्यातील शेळी चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद
Crime News : दरम्यान, पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत संबंधित आरोपी तळेगाव दाभाडे एमआयडीसी परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने तत्काळ त्या परिसरात शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतले.

कोरेगाव भीमा : शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरी करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी तळेगाव दाभाडे एमआयडीसी परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने शिक्रापूर व शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तीन शेळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाणे व शिरूर पोलीस ठाण्यात कलम ३०३ (२) अन्वये गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत संबंधित आरोपी तळेगाव दाभाडे एमआयडीसी परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने तत्काळ त्या परिसरात शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव भोईटी उर्फ कृष्णा कांतीलाल काळे (वय २५) असे असून, तो सध्या नवलाख उंबरे, ता. खेड, जि. पुणे येथे राहत असून मूळचा डिगी काळेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने वरील तीन शेळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. तसेच त्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने हे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर कार (एमएच १४ एलव्ही ११५०) पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केली आहे. आरोपी तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन पुढील कायदेशीर कारवाईसाठी रिपोर्टसह शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत असून, चोरीच्या शेळ्या तसेच आणखी काही गुन्ह्यांचा संबंध आहे का, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सदर ची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलीस फौजदार संजय पड्याळ, पोलीस हवालदार तुषार पंदारे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, पोलीस हवालदार संजू जाधव, पोलीस हवालदार राजू मोमीन, पोलीस हवालदार विकास पाटील आणि पोलीस अंमलदार सागर धुमाळ यांनी केली.
शेळ्या चोरीला जाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
शिरूर तालुक्यात अनेक शेतकरी शेळीपालन हा जोडधंदा म्हणून करतात. शेळ्या चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे थेट आर्थिक नुकसान होत असून, कष्टाने वाढविलेल्या पशुधनाची चोरी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेळ्यांच्या सुरक्षिततेसाठी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घेणे, गोठ्याच्या परिसरात प्रकाश व्यवस्था व सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच अनोळखी व्यक्ती किंवा वाहनांची हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. या प्रकरणातील आरोपी जेरबंद झाल्याने शेळी चोरीच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.





