पुणे : मंगळवार पेठ परिसरात दिवसा घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ८ लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मंगळवार पेठ येथील फिर्यादी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला. घरातून ७ लाख २९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याची तक्रार समर्थ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर २५७/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (१), ३३१ (१) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने व गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनिल मल्हारी तलवारे (वय ३८, रा. अजंठानगर, आकुर्डी) व एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरीतील दागिने विक्रीसाठी शिवानंद दशरथ मोची उर्फ मोची मामा (वय ४०, रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) याच्याकडे दिल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने व १० हजार रुपये रोख, असा एकूण ८,११,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासात आरोपींनी खराडी, चंदननगर पोलीस स्टेशन तसेच रायगड जिल्ह्यातील महाड शहर पोलीस स्टेशन हद्दीतही घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक) राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-०१ कृषिकेश रावले, सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे, वाहन चोरी व दरोडा पथक-२चे सहा. पोलीस निरीक्षक बेरड, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, तसेच पोलीस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख, शरद घोरपडे, भाग्येश यादव, विक्रांत सासवडकर, विनायक येवले यांनी सहभाग घेतला.