H-1B Visa Sponsorship: अमेरिकेत भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ; ‘या’ कंपनीचा व्हिसा-ग्रीन कार्डबाबत निर्णय
H-1B Visa Sponsorship: अमेरिकेत H-1B व्हिसावर काम करणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांसाठी आयबीएम (IBM) कंपनीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

H-1B Visa Sponsorship: अमेरिकेत H-1B व्हिसावर काम करणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांसाठी आयबीएम (IBM) कंपनीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या कन्सल्टिंग विभागातील बहुतांश पदांसाठी H-1B व्हिसा आणि ग्रीन कार्ड स्पॉन्सरशिप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाचा परिणाम अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांवरही होण्याची शक्यता आहे. प्रभावित कर्मचाऱ्यांना अमेरिकेबाहेर बदली स्वीकारावी लागणार आहे किंवा नोकरी सोडण्याचा पर्याय निवडावा लागणार आहे.
कर्मचाऱ्यांसमोर दोन पर्याय
मिळालेल्या वृत्तानुसार, आयबीएमने प्रभावित कर्मचाऱ्यांना निर्णय घेण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. या काळात कर्मचाऱ्यांना अमेरिकेबाहेरील आयबीएमच्या कार्यालयात बदली स्वीकारायची की नोकरी सोडायची, हे ठरवावे लागणार आहे.
बदली स्वीकारण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे वेतन भरपाई म्हणून दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अशा कर्मचाऱ्यांसाठी ३१ डिसेंबर २०२६ हा शेवटचा कामाचा दिवस निश्चित करण्यात आल्याचे वृत्त आहे.
भारतात बदलीच्या सर्वाधिक संधी H-1B Visa Sponsorship:
आयबीएमच्या कन्सल्टिंग विभागात जगभरात दीड लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, या निर्णयामुळे नेमके किती कर्मचारी प्रभावित होतील, याबाबत कंपनीने स्पष्ट आकडेवारी दिलेली नाही. दरम्यान, अमेरिकेबाहेरील उपलब्ध नोकऱ्यांमध्ये भारतातील पदांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.
१९ नोव्हेंबर रोजी आयबीएमच्या करिअर पोर्टलवर अमेरिकेबाहेर कन्सल्टिंग विभागातील एकूण १,२७८ पदे उपलब्ध होती. यापैकी तब्बल १,१२५ पदे भारतात, २३ सिंगापूरमध्ये आणि १८ ब्रिटनमध्ये होती. त्यामुळे प्रभावित कर्मचाऱ्यांसाठी भारतात बदलीचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
IBM ने हा निर्णय का घेतला?
आयबीएमच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची उपलब्धता आणि ग्राहकांच्या गरजांमध्ये बदल होत आहेत. या बदलत्या परिस्थितीचा विचार करून कन्सल्टिंग विभागातील बहुतांश पदांसाठी व्हिसा आणि ग्रीन कार्ड स्पॉन्सरशिप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, हा निर्णय संपूर्ण आयबीएम कंपनीसाठी लागू नसून केवळ कन्सल्टिंग विभागातील बहुतांश पदांपुरता मर्यादित आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
भारतीय कर्मचाऱ्यांच्या चिंतेत वाढ H-1B Visa Sponsorship:
अमेरिकेतील H-1B व्हिसासंदर्भातील नियम आणि धोरणांमध्ये होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर आयबीएमचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांसाठी व्हिसाचे नूतनीकरण, ग्रीन कार्ड आणि नोकरीतील स्थैर्य हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. अशा परिस्थितीत कंपनीच्या निर्णयामुळे प्रभावित कर्मचाऱ्यांसमोर परदेशात बदली किंवा नोकरी सोडण्याचा पर्याय उभा राहिला आहे.


