नवी दिल्ली: अमेरिकेच्या नव्या ‘सोशल मीडिया तपासणी’ नियमांमुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे. या नियमांमुळे H-1B व्हिसा अपॉइंटमेंट्स अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे शेकडो भारतीय व्हिसाधारक मायदेशातच अडकून पडले आहेत, ज्यामुळे त्यांच्या नोकरी आणि करिअरवर मोठे संकट उभे राहिले आहे. व्हिसा अपॉइंटमेंट्स मार्च २०२६ पर्यंत पुढे ढकलल्या- H-1B व्हिसासाठी अर्ज केलेल्या अनेक लोकांना मंगळवारी अमेरिकेच्या दूतावासातून ई-मेल आले. या ईमेलमध्ये नमूद केले होते की, त्यांची या आठवड्यात नियोजित असलेली व्हिसा अपॉइंटमेंट रद्द करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक अर्जदारांना आता मार्च २०२६ पर्यंतच्या नवीन तारखा देण्यात आल्या आहेत. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे व्हिसा अर्जदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोशल मीडिया तपासणी नियम ठरला कळीचा मुद्दा – व्हिसा अपॉइंटमेंट्स पुढे ढकलण्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचा नवीन सोशल मीडिया तपासणी नियम. हा नियम १५ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार आहे. या नियमांतर्गत, व्हिसा अधिकारी अर्जदारांच्या सर्व सोशल मीडिया खात्यांची कसून तपासणी करतील. अमेरिकेविरुद्ध कोणीही कोणतीही नकारात्मक पोस्ट किंवा टीका केली आहे का, हे पाहिले जाईल. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी हा नियम लागू करण्याची तयारी करण्यासाठी वेळ काढल्यामुळे सध्या अपॉइंटमेंट्स रद्द कराव्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. शेकडो H-1B धारक मायदेशी अडकले – डिसेंबर महिन्यातील बहुतेक व्हिसा अपॉइंटमेंट्स रद्द झाल्यामुळे शेकडो H-1B व्हिसाधारक भारतात अडकले आहेत. यापैकी अनेक जण फक्त व्हिसावर ‘स्टॅम्पिंग’ (Visa Stamping) करून घेण्यासाठीच भारतात आले होते. मात्र, आता त्यांना दीर्घकाळ भारतातच थांबावे लागण्याची शक्यता आहे. यातील काहींनी तर अमेरिकेत भाड्याचे घर खाली केले आहे आणि इंटरनेट-वीज यांसारख्या सुविधाही बंद केल्या आहेत. मदतीसाठी सोशल मीडियावर कळकळीची विनंती – या संकटाच्या काळात ‘रेडिट’ (Reddit) या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना या पोस्टद्वारे विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी स्वेच्छेने जानेवारी किंवा फेब्रुवारीतील त्यांच्या व्हिसा अपॉइंटमेंट्स रद्द कराव्यात, जेणेकरून भारतात अडकलेल्या लोकांना लवकर स्लॉट मिळू शकतील. नोकरी जाण्याचा धोका – या विलंबाबद्दल अनेक व्हिसा धारकांनी चिंता व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिले की, “मी व्हिसा स्टॅम्पिंगसाठी सुट्ट्या घेतल्या होत्या आणि माझा नियोक्ता (Employer) रिमोट काम करण्याची परवानगी देत नाहीये. माझी अपॉइंटमेंट मे २०२५ पर्यंत पुढे गेल्यामुळे माझी नोकरी नक्कीच जाईल.” अशा अनेक गंभीर घटना समोर येत आहेत. वकिलांनी व्यक्त केली चिंता – अमेरिकेच्या इमिग्रेशन वकील एलेन फ्रीमैन यांनी या निर्णयाचे परिणाम अतिशय गंभीर असतील असे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, “अनेक H-1B कर्मचारी यामुळे आपली नोकरी गमावू शकतात. कंपन्या अनेक महिने कर्मचाऱ्यांची वाट बघू शकत नाहीत, खासकरून सध्याच्या आर्थिक परिस्थितीत. या विलंबाचा परिणाम कर्मचाऱ्यांवर, त्यांच्या कुटुंबांवर आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही होईल.” तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला: इमिग्रेशन वकील रेबेका चेन यांनी भारतीय H-1B धारकांना सध्या भारताचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या की, जे लोक सध्या अमेरिकेत आहेत, त्यांनी फक्त स्टॅम्पिंगसाठी भारतात येऊ नये. तर, जे आधीच भारतात आहेत आणि ज्यांच्याकडे वैध व्हिसा स्टॅम्प नाही, त्यांना आता नवीन अपॉइंटमेंटची वाट पाहावी लागणार आहे.