Chief Election Commissioner appointment | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्ञानेश कुमार यांची भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. कुमार हे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्विकारतील. त्यांची राजीव कुमार यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या कायद्यांतर्गत नियुक्त होणारे ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ठरले आहेत. 2023 च्या कायद्यानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कोण आहेत? निवडणूक आयुक्तांची निवड करण्याची प्रक्रिया काय आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. कशी केली जाते मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती? भारतीय संविधानाच्या कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोगाविषयी माहिती देण्यात आली आहे. यांतर्गत निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया सांगण्यात आली आहे. निवडणूक आयोग हा लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, राष्ट्रपती-उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसाठी जबाबदार असतो. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 1950 ला झाली. त्यानंतर निवडणूक आयोगातील सदस्यांमध्ये वेळोवेळी बदल झाला आहे. सद्यस्थितीमध्ये निवडणूक आयोगात एक मुख्य निवडणूक आयुक्तांसह दोन निवडणूक आयुक्तांचा समावेश आहे. याआधी परंपरेनुसार आयोगातील वरिष्ठ निवडणूक आयुक्तांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली जात असे. सरकारच्या शिफारसीनंतर राष्ट्रपतींद्वारे ही नियुक्ती केली जात असे. मात्र, 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही नियुक्ती केवळ शिफारसीच्या आधारावर न करता, स्वतंत्र समितीने करावी असे म्हटले होते. या समितीमध्ये सरन्यायाधीशांचाही समावेश करण्यात आला होता. मात्र, नंतर सरकारने नवीन कायदा आणत या प्रक्रियेत बदल केला. या कायद्यांतर्गत सरन्यायाधीशांना निवड समितीतून वगळण्यात आले. त्याजागी पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्ष नेता व कॅबिनेट मंत्री (पंतप्रधानांद्वारे नियुक्त) अशा 3 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीद्वारेच नवीन निवडणूक आयुक्त व मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड केली जाते. नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरून वाद का? ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीबाबत काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि राहुल गांधी यांच्या तीन सदस्यीय समितीने नियुक्तीचा निर्णय घेतला. मात्र, ही नियुक्ती 2:1 च्या बहुमताने झाली आहे. कारण, राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायलयात चालू असलेल्या निवड प्रक्रिया कायद्यासंदर्भात सुनावणीचा हवाला देत असहमत असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही पंतप्रधान, विरोधीपक्ष नेता व पंतप्रधानांद्वारे नियुक्त मंत्री अशा तीन सदस्यांच्या समितीद्वारे होते. मात्र, या समितीमध्ये सरन्यायाधीशांचा समावेश नाही हा वादाचा मुद्दा ठरला आहे. सरन्यायाधीशांचा निवड प्रक्रियेमध्ये समावेश नसल्याने समिती कमकुवत झाली आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. तसेच, या प्रकरणाची सुनावणी देखील सर्वोच्च न्यायालयात पार पडणार आहे. मात्र, सुनावणीआधीच ही नियुक्ती करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. कोण आहेत ज्ञानेश कुमार? ज्ञानेश कुमार यांची देशाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते निवडणूक आयुक्त असतानाच लोकसभा 2024 च्या निवडणूका पार पडल्या होत्या. ज्ञानेश कुमार हे 1988 च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. कुमार यांनी आयआयटी कानपूर येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेकची पदवी घेतली आहे. तसेच, त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट्स ऑफ इंडिया येथून बिझनेस फायनान्सचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय, त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पर्यावरण अर्थशास्त्राचाही अभ्यास केला आहे. 61 वर्षीय कुमार यांनी 2019 मध्ये जम्मू-कश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी तीन तलाक रद्द करण्यासंबंधीच्या मसुदा समितीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते जानेवारी 2024 मध्ये सहकार मंत्रालयाचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले होते. संसदीय कामकाज विभागाचे सचिव, गृह खात्याचे सह सचिव आणि अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात होणार महत्त्वाच्या निवडणुका राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त असताना त्यांना विरोधकांच्या अनेक आरोपांना सामोरे जावे लागले. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील 31 विधानसभा निवडणुका आणि 2024 ची लोकसभा निवडणूक पार पडली. आता ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालीही अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत असेल. त्यामुळे अनेक विधानसभा व इतर निवडणुका योग्यरित्या पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. यावर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तसेच, पुढील एक ते दोन वर्षात, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात, हिमाचल प्रदेश, गोवा, पंजाब, यूपी, उत्तराखंड, मणिपुर, कर्नाटक, मेघालय, नागालँड, मिझोरम, त्रिपुरा, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुका होणार आहेत. 2027 मध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका देखील आहेत. तसेच, अनेक राज्यांमध्ये या काळात राज्यसभेच्या निवडणुका देखील पार पडणार आहेत. या सर्व निवडणुका ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होतील. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ हा महत्त्वाचा ठरणार आहे.