New Chief Election Commissioner | ज्ञानेश कुमार यांची देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देशाचे 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. या निवड समितीत पंतप्रधान मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील सहभागी होते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या जागी आता ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त कार्यभार स्वीकारतील. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांच्याकडे पुढील काही महिन्यात पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, बिहार आणि आसाम या राज्यातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी असणार आहे. कुमार हे 26 जानेवारी 2029 पर्यंत या पदावर राहणार आहेत. ते मुख्य निवडणूक आयुक्त असताना एकूण 20 विधानसभा निवडणुका, 2027 मधील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुका तसेच 2029 लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे नेतृत्व करणार आहेत. कोण आहेत ज्ञानेश कुमार? ज्ञानेश कुमार हे 1988 च्या बॅचचे केरळ कॅडरमधील आयएएस अधिकारी आहेत. ते केंद्रीय गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव राहिले आहेत. कुमार यांनी आयआयटी कानपूर येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेकची पदवी घेतली आहे. तसेच, त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट्स ऑफ इंडिया येथून बिझनेस फायनान्सचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय, त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पर्यावरण अर्थशास्त्राचाही अभ्यास केला आहे. 2019 मध्ये जम्मू-कश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विधेयकाचा मसुदा तयारीत त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली. तीन तलाक रद्द करण्यासंबंधीच्या मसुदा समितीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात. जानेवारी 2024 मध्ये सहकार मंत्रालयाचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले होते. संसदीय कामकाज विभागाचे सचिव, गृह खात्याचे सह सचिव आणि अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. 61 वर्षीय कुमार यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीनंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती.