Gyanesh Kumar : लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या पाठोपाठ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारा ठराव मांडण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. त्यासाठीची नोटीस लवकरच सादर केली जाणार असल्याचे समजते. कुमार (Gyanesh Kumar) यांच्या विरोधातील ठरावासाठीच्या नोटिसीचा मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसने पुढाकार घेतल्याचे संकेत मिळत आहेत. अर्थात, त्या पक्षातील सुत्रांनी संबंधित नोटीस म्हणजे विरोधकांचे टीमवर्क असल्याचे सांगितले. समविचारी पक्षांनी एकत्र येत योजना आखली. तसेच, नोटिसीचा मसुदा बनवला, असे त्या सुत्रांनी नमूद केले. प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसचाही नोटिसीला पाठिंबा असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली. कुमार यांनी अत्यंत महत्वाच्या पदाची प्रतिष्ठा कमी केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. देशातील विविध निवडणुकांत मोठ्या प्रमाणात अनियमितता घडत आहेत. त्यासाठी कुमार जबाबदार आहेत, असे टीकास्त्र विरोधकांकडून सातत्याने सोडले जात आहे. अनेक राज्यांत मतदारयाद्यांची पडताळणी (एसआयआर) झाली. त्या मोहिमेवरही विरोधकांकडून तीव्र आक्षेप घेतले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर, विरोधक कुमार यांच्या संदर्भात आणखी आक्रमक बनल्याचे सूचित होत आहे.