– ह.भ.प. रामेश्वर म. घुले चहूं वेदीं जाण साही शास्त्रीं कारण। अठराही पुराणें हरिसी गाती ।। मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ।। एक हरि आत्मा जीवशिवसमा । वायां तूं दुर्गमा न घालीं मन।। ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ।। चार वेद, सहा शास्त्र आणि अठरा पुराणें यांचे तात्पर्य पाहिले तर ते सर्व हरिचेच वर्णन करतात. माऊली सांगतात, ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातील लोणी काढून घेतले जाते व असार ताक बाजूला काढले जाते त्याप्रमाणे वेदशास्त्रपुराणांत सांगितलेल्या कथांमधून केवळ सारभूत हरिचे विचाराने ग्रहण करावे आणि त्यातील ताकाप्रमाणे असणाऱ्या इतर कथांचा त्याग करावा. हरि जो एक आत्मा आहे त्याची व्याप्ती शिवामध्ये आणि जीवांमध्ये एकसारखीच आहे. त्या हरिला सोडून इतर समजण्यास कठीण असणाऱ्या कोणत्याही गोष्टींमध्ये मन घालू नये. हरि हाच वैकुंठ असून तो सर्व ठिकाणी आहे.