साताऱ्यात पडकला सहा लाखांचा गुटखा

सातारा – महाराष्ट्रात उत्पादन व विक्रीवर बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करताना अर्जुन कुमार चव्हाण, विशाल अजित हुल्ले (रा. रुई, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांना सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचा सहा लाख 63 हजार 800 रुपयांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहन, असा एकूण 16 लाख 63 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना बुधवारी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके यांना कारवाईच्या सूचना दिल्या. फाळके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सकाळी 11.30 च्या सुमारास वाढे फाटा येथे सापळा लावला असता, टोयोटा इनोव्हा कार (एमएच-09-बीबी-6696) ही समोरून येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये सहा लाख 63 हजार 800 रुपयांचा गुटखा सापडला. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, हा गुटखा विक्रीसाठी पुण्यात नेत असल्याची कबुली त्यांनी दिली.
अन्नसुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून, पुढील तपासणी करण्यात आली. संशयितांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके, अंमलदार उत्तम दबडे, आतिश घाडगे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, मोहन पवार, प्रवीण कांबळे, गणेश कापरे, अजय जाधव, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम यांनी ही कारवाई केली.





