Gutkha Seized – चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गोखलेनगर परिसरात धडक कारवाई करत बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेला प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली असून, तब्बल १९ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ एप्रिल रोजी गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग सुरू असताना चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या पथकाला माहिती मिळाली, की गोखलेनगर येथे एका ठिकाणी विनापरवाना प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखा साठवून त्याची विक्री केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व खात्री करून छापा टाकला. या कारवाईदरम्यान अमर नंदू पन्हाळकर (३७, रा. १०१, जनवाडी जनता वसाहत, पुणे) याला ताब्यात घेतले. तपासात त्याच्याकडे विक्रीसाठी साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व पानमसाला आढळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १३ लाख ५१ हजार १५० रुपये किमतीचा तंबाखूजन्य माल, तसेच ६ लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण १९ लाख ५१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे करीत आहेत. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ४) चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त (खडकी विभाग) विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी ननावरे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार इरफान मोमीन, बाबुलाल तांदळे, श्रीकांत वाघवले व शिर्के केली.