प्रभात वृत्तसेवा पिंपरी – गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पुणे–मुंबई महामार्गावर ट्रकमधून बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला जेरबंद केले. त्याच्याकडून ११ लाख ४७ हजार ९०० रुपयांच्या गुटख्यासह एकूण ३६ लाख ४७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईमुळे गुटखा रॅकेटला मोठा आर्थिक फटका बसला आहे. नरेश गणेश चौधरी (वय २२ वर्षे, रा. वेलकम होम अप्लायंस, स्पाईन रोड, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २) ट्रकमधून गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक रावसाहेब मोटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बालेवाडी येथील ऑर्चिड हॉटेलजवळ सापळा रचून संशयित ट्रक रोखला. ट्रकमधील मालाबाबत विचारणा केली असता आरोपीने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे दोन पंचांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेतली असता शासनाने बंदी केलेला ११ लाख ४७ हजार ९०० रुपये किमतीचा गुटखा व २५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ३६ लाख ४७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक रावसाहेब मोटे, उपनिरीक्षक महेश खांडे, हवालेदार नितीन लोखंडे, गणेश कोकणे, पवन वाजे, समीर रासकर, अमर कदम, सुमित देवकर, ज्ञानेश्वर कौलगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. बावधन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल असून, गुटखा पुरवठा साखळीतील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.