राजगुरूनगर(प्रतिनिधी) – नाशिक-पुणे महामार्गावरून पुणे येथे विक्रीसाठी नेण्यात येत असलेला तब्बल 91 लाखांच्या गुटख्यासह टेम्पो असा एकूण 1 कोटी 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चाकण पोलिसांनी जप्त केला आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांनी दिली. गणेश विठ्ठल भाडळे (वय 32, रा. कोयाळी, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. रविवारी (दि. 10) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास चाकण पोलीसांना नाशिक-पुणे महामार्गावरून पुणे येथे अवैधरित्या गुटख्याचा टॅम्पो जाणार असल्याची गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी अधिकारी व अंमलदार यांना बातमीची खात्री करून कायदेशिर कारवाई करण्याच्या सूचना व मार्गदर्शन केले. त्यावरून चाकण पोलीसांनी वाकी खुर्द परिसरात नाशिक पुणे महामार्गावरील रोहकल फाट्याचे रिपड ब्रेकर जवळ सापळा रचून टेम्पो (एमएच 22 एए 1710)वर छापा टाकला. टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण 91 लाख20हजार रूपये किंमतीचा गुटख्याचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला माल मिळून आला आहे. गुटखा व टेम्पो असा एकूण 1 कोटी 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, निरीक्षक अनिल देवडे, सहायक निरीक्षक विक्रम गाकयवाड, प्रसन्न जऱ्हाड, उपनिरीक्षक निलेश चव्हाण, सहायक फौजदार सुरेश हिंगे, पोलीस हवालदार संदीप सोनवणे, पोना भैरोबा यादव, हनुमंत कांबळे, निखील शेटे, पोलीस कॉस्टेबल चेतन गायकर, नितीन गुंजाळ, प्रदीप राळे, निखील वर्पे यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड करीत आहेत.