Gutka Seized – पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल पाच लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा एका महिलेच्या घरातून जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात गुटखा बंदी केवळ कागदावरच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोणी काळभोर परिसरात गुटखा माफियांचे मोठे जाळे सक्रिय असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वैशाली संजय खेतमाळीस (वय 48) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अशोक भागवत गिरी यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणी काळभोर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक परिसरात गस्त घालत असताना माळी मळा परिसरात एका महिलेने गुटख्याचा मोठा साठा करून विक्री सुरू असल्याची माहिती खबर्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी घरात प्रवेश करताच हॉलमध्ये मोठमोठ्या पोत्यांमध्ये आणि बॅगमध्ये भरून ठेवलेला गुटखा पाहून अधिकारीही चक्रावले. उघड्यावरच ठेवण्यात आलेल्या पोत्यांमध्ये डायरेक्टर स्पेशल पान मसाला, विमल पान मसाला, आरएमडी, रजनीगंधा, वी-1 तंबाखू, तुलसी तंबाखू तसेच शॉट प्रीमियम च्युइंग टोबॅको यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. या छाप्यात पोलिसांनी एकूण 5 लाख 7 हजार 199 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले हे पदार्थ असून त्यांची विक्री आणि साठवणूक गंभीर गुन्हा मानला जातो. तरीदेखील लोणी काळभोर परिसरात खुलेआम असा काळाबाजार सुरू असल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे. नफेखोरीसाठी हा जीवघेणा व्यवसाय सुरू असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे किराणा दुकानाच्या आडून हा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहितीही पुढे आली आहे. पोलिसांनी पंचांसमक्ष सर्व मुद्देमाल जप्त करून नमुने सीलबंद केले असून उर्वरित साठा ताब्यात घेतला आहे.