पिंपरी | टाकवे गावचे गुरूदेव गरूड सी.ए. परीक्षेत यशस्वी

कार्ला, (वार्ताहर) – टाकवे खुर्द येथील गुरूदेव गोरक्षनाथ गरूड यांनी शिक्षण क्षेत्रात अवघड समजली जाणारी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया कडून घेण्यात आलेल्या सी.ए. फायनल परीक्षेत यश मिळविले आहे. या यशाबद्दल गुरूदेव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशाचे सर्व श्रेय गुरूदेव आई-वडिल आणि मार्गदर्शकांना देतात.
गुरूदेव यांचे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे खुर्द येथे झाले. तर, आठवी ते दहावीचे शिक्षण लोणावळातील गुरूकुल हायस्कूल येथे झाले.
अकरावी ते पदवी पर्यंतचे शिक्षण त्यांनी मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर येथून घेतले. सीए कोर्सला प्रवेश घेतल्यानंतर प्रवेश परीक्षा सीपीटी पहिल्याच प्रयत्नात पास केली. त्यानंतर यश अपयशाची मालिका सुरू झाली.
२०१५ वर्षात इंटरचा पहिला ग्रुप, मे २०१७ साली इंटरचा दुसरा ग्रुप, डिसेंबर २०२१ साली सीए फायनलचा पहिला ग्रुप आणि मे २०२४ साली सीए फायनल शेवटचा ग्रुप पास झाला. अथक प्रयत्नांनी त्यांनी हे यश मिळविल्याने सर्वत्र कौतूक होत आहे.





