घृणास्पद ! विजेचा शॉक देऊन पित्याची हत्या; आरोपी मुलाने गुपचूप अंत्यसंस्कारही केले

नवी दिल्ली – मागील दीड वर्षांपासून देशात करोना संसर्गामुळे लॉकडाऊनची स्थिती आहे. या काळात गुन्हेगारी कमी झाली. मात्र कौटुंबीक हिंसा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच पंजाबमधील गुरुदासपूरमधून घृणास्पद वृत्त समोर आलं असून मुलाने विजेचा शॉक देऊन आपल्या जन्मदात्या पित्याची हत्या केली आहे.
गुरुदासपूरमधील जफरवाल गावात पित्याने संपत्तीतून बेदखल करण्याचा उच्चार केल्याच्या रागातून मुलाने पित्याची शॉक देऊन हत्या केली. कोणालाही संशय येऊ नये म्हणून गुपचूप अंत्यसंस्कारही केले. 14 जुलै रोजी मुलाने पित्याची हत्या केली. मात्र पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत म्हणजेच 19 जुलै रोजी आरोपीचा शोध लावला. आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.
हरपाल सिंह असं आरोपीचं नाव असून त्याने वडील तरसेम सिंह यांना रात्री ट्रॉलीमध्ये घेऊन अंत्यसंस्कार केले आणि राखही विसर्जित केली. तरसेम सिंह यांचा मोठा मुलगा रछपाल सिंह याने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करून आरोपीला अटक केली.
रछपाल सिंहने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आई बलविंदर कौर यांचा 2019 मध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर वडिलांनी जमीन दोन्ही मुलांना समान वाटप करून दिली. हरपाल सिंह वडिलांना जेवायला देखील देत नव्हता. त्यामुळे ते अनेकदा त्याला संपत्तीतून बेदखल करण्याची धमकी देत होते. याच रागातून त्याने वडिलांची हत्या केली.
रछपाल मोहाली येथे व्यावसाय करतो. मृत्यूनंतर हरपालने तीन दिवस रछपाल यांना वडिलांचा थांगपत्ता लागू दिला नाही. एकेदिवशी अचानक वडिलांचं निधन झाला असून हरपालने त्यांचे अंत्यसंस्कार केल्याचे रछपाल याला कळलं.
दरम्यान रछपाल याला त्याच्या मामाचा मुलगा बलराज सिंहने सांगितले की, 14 जुलै रोजी हरपला आणि वडिलांचं कडाक्याचं भांडण झालं होत. त्यानंतर हरपालने पंख्याच्या वायरने पित्याला करंट देऊन ठार केलं. याची कबुली खुद्द रछपालने आपल्यासमोर दिल्याचे बलराजने सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली.


