कराड तालुक्यात खळबळ : विरोधी टोळीचे कृत्य, शहरात तणाव अन् बंद
खुनानंतर जमावाकडून तोडफोड
पवनवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर तेथून परतणाऱ्या जमावाने मंगळवार पेठेत संशयितांच्या घरांकडे मोर्चा वळवला. जाताना त्यांनी रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दोन कार, ट्रकच्या काचा फोडल्या. संशयितांच्या घरांवर दगडफेकही करण्यात आली. आठ-दहा दुचाकींचे नुकसान करण्यात आले. तेथे पोलीस पोहोचल्यानंतर जमाव पुढे निघून गेला.
कराड – पवन दीपक सोळवंडे या पोलीस रेकॉर्डवरील संशयितावर विरोधी टोळीने बुधवार पेठेतील भर वस्तीत शिरून बेछूट गोळीबार करून त्याचा निर्घृण खून केला. मंगळवारी मध्यरात्री 12.45 च्या सुमारास घडलेल्या घटनेने कराड शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. या खुनाची बातमी पहाटेच वाऱ्यासारखी पसरल्याने शहरातील व्यापारपेठेतील दुकाने आज दिवसभर बंद होती. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या दिवसभर शहरात ठाण मांडून होत्या. शहरात तणावपूर्ण वातावरण असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पूर्ववैमनस्य आणि गुंडांच्या टोळ्यांच्या वर्चस्ववादातून पवन सोळवंडेचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
जुनैद शेख, समीर मुजावर, मजहर मुजावर, शिवराज इंगवले, हैदर मुल्ला अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली आहेत. पवनला मारण्याचा कट रचल्याची माहिती असल्याच्या संशयावरून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराडमधील प्रभात चित्रपटगृहाशेजारी पवन सोळवंडेवर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या छातीत व पोटात गोळ्या झाडण्यात आल्या. या प्रकरणात मलकापूर येथील जुनैद शेख, समीर मुजावर, मजहर मुजावर, शिवराज इंगवले, हैदर मुल्ला यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कासेगावचा दरोडा,
गुंड पवन सोळवंडेचा गोळ्या घालून खून कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरी आणि खंडणी, असे तीन वेगवेगळे गुन्हे पवनवर दाखल आहेत.
जुनैद शेख, शिवराज इंगवले यांच्या टोळीशी खुन्नस असल्याने दोन वर्षापासून त्यांच्यात वर्चस्ववाद सुरू होता. जुनेद शेख व त्याचे साथीदार मंगळवारी दोन दुचाकी आणि कारमधून बुधवार पेठेत आले. महात्मा फुले पुतळ्याशेजारील पानपट्टीतील उदय सातपुते व महेश दुबळे यांना त्यांनी अडवले. पवन कुठाय, त्याला आम्ही खलास करणार आहे, असे ते म्हणत पवन राहत असलेल्या वस्तीत शिरू लागले असता, त्यांना अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी जुनैदने हवेत गोळीबार केला. शिवराजकडेही पिस्तूल होती. जुनैद व शिवराज यांनी पिस्तूल दाखवत त्या दोघांना पवनबाबत विचारले. त्यांनी हवेत गोळीबारही केला. त्यावेळी घरात टीव्ही बघत बसलेला पवन गोळीबाराचा आवाज ऐकून धावत बाहेर आला.
पवनला पाहताच जुनैद शेख, समीर मुजावर, मजहर मुजावर, शिवराज इंगवले, हैदर मुल्ला त्याला मारण्यासाठी धावत गेले. पवनवर जुनैद व त्याच्या दोन साथीदारांनी बेछूट गोळीबार केला. त्यात छाती, पोट व मानेवर गोळ्या लागल्याने पवन जागीच बेशुद्धावस्थेत पडला होता. पवन घरातून बाहेर धावल्याने त्याच्या बहिणी पूजा व काजल यादेखील बाहेर धावत आल्या. गोळीबार सुरू असताना सातपुते व दुबळे तेथून पळाले.
गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर कार आणि दुचाकीवरून पळून गेले. त्यानंतर सातपुते व दुबळे हे पुन्हा घटनास्थळी आले. त्यावेळी पवन बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याला दोघांनी रिक्षातून सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, उपचारापूर्वीच पवनचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेनंतर पवनच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी त्याच्या नातेवाइकांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी पवनचा मृतदेह ताब्यात घेतला.
याबाबत महेश दुबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते पहाटेच शहरात दाखल झाल्या. येथील स्मशानभूमीत बुधवारी दुपारी चारच्या सुमारास पवनवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पवनवर झालेल्या गोळीबाराच्या धक्क्याने त्याच्या आजीचे निधन झाल्याची चर्चा परिसरात होती. मात्र, आजी दोन दिवसांपासून अत्यवस्थ होत्या. त्यातच मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
-कराडमध्ये पुन्हा गॅंगवॉरचा भडका
-शहर पोलीस ठाण्यासमोर नातेवाईकांचा ठिय्या
-जमावाने दुचाकी जाळली, टपऱ्या उलटवल्या
-दोन कार, ट्रक, बारा दुचाकींसह रिक्षांचे नुकसान
-संशयितांच्या घरांवर दगडफेक
-पोलिसांकडून दोघांना अटक
-कराडमध्ये बंद, तणावपूर्ण शांतता
-कडेकोट पोलीस बंदोबस्त
-व्यापारी पेठ, वडाप वाहतूकही बंद