Gulzar: भारतीय चित्रपटसृष्टीतील शब्दांचे जादूगार गुलजार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव…

Gulzar: हिंदी चित्रपटसृष्टीतील महान कवी, गीतकार, पटकथाकार, दिग्दर्शक आणि साहित्यिक गुलजार यांचा आज वाढदिवस. भारतीय चित्रपटसृष्टीत गेल्या सहा दशकांपासून आपल्या अविस्मरणीय शब्दांनी आणि दिग्दर्शनाने जादू निर्माण करणाऱ्या गुलजार यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३४ रोजी पाकिस्तानातील झेलम जिल्ह्यातील दीना या गावात झाला. त्यांचे खरे नाव संम्पूर्ण सिंह कालरा असे असून “गुलजार” हे त्यांचे टोपणनाव आहे.
शब्दांची जादू
गुलजार यांचे नाव घेतले की मनात लगेच प्रेम, वेदना, निसर्ग आणि माणसाच्या भावविश्वाचे सुंदर चित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्यांनी लिहिलेली गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. १९६३ मध्ये “बंधिनी” चित्रपटासाठी त्यांनी पहिले गाणे लिहिले. त्यानंतर त्यांनी “मौसम”, “आंधी”, “खोसला का घोसला”, “सत्या”, “दिल से”, “ओंकारा”, “गुरु” अशा अनेक चित्रपटांसाठी गीतं लिहिली.
दिग्दर्शनातील ठसा
फक्त गीतकारच नव्हे तर दिग्दर्शक म्हणूनही गुलजार यांनी अमिट छाप सोडली. “आंधी”, “किनारा”, “खुशबू”, “मौसम” हे त्यांचे दिग्दर्शित चित्रपट आजही हिंदी चित्रपटसृष्टीचे मानदंड मानले जातात. सामाजिक प्रश्न, मानवी नाती आणि भावनांचा खोलवर शोध घेण्याची हातोटी त्यांच्या प्रत्येक चित्रपटात दिसते.
पुरस्कारांची शिदोरी
गुलजार यांनी आपल्या प्रतिभेने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळवला आहे.त्यांना ५ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.त्यांना पद्मभूषण (२००४) ने सन्मानित करण्यात आले.तसेच ऑस्कर पुरस्कार (२००९) “जय हो” या गाण्यासाठी मिळाले. याचबरोबर ग्रॅमी पुरस्कार देखील त्यांनी पटकावला आहे.
साहित्य क्षेत्रातील योगदान
गुलजार हे फक्त चित्रपटगीतापुरते मर्यादित नाहीत. ते एक उत्कृष्ट कवी, लेखक आणि नाटककार आहेत. त्यांची कविता साधी, माणसांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेली आणि भावनांना भिडणारी आहे. त्यांच्या “रावी पार”, “पुखराज”, “एक ठहाका सी लम्बी खामोशी” या कविता संग्रहांनी त्यांना साहित्यविश्वातही मान मिळवून दिला. मुलांसाठीही त्यांनी सुंदर कविता लिहिल्या आहेत.
आजचा सन्मान
आज गुलजार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर #HappyBirthdayGulzar ट्रेंड करत असून त्यांच्या आवडत्या गाण्यांचे व्हिडिओ, ओळी आणि आठवणी शेअर केल्या जात आहेत.





