अमरेली : गुजरातच्या अमरेली येथील एका न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे.त्येप्रकरणी दोषी असलेल्या तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या तिघांना एकूण १८,२४,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. गुजरातच्या इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच शिक्षा आहे. हा खटला नोव्हेंबर २०२३ चा आहे. अभियोक्ता चंद्रेश बी. मेहता यांनी सांगितले की, अमरेलीच्या बाहेरील मोटा खटकीवाड कोळीवाड येथील रहिवासी अक्रमभाई हाजीभाई सोलंकी यांनी त्यांच्या घरी गायी आणि वासरे कापली आणि त्यांचे मांस विकले. वनराजभाई मांजरिया यांना ६ नोव्हेंबर २०२३ रोजी त्याविषयी माहिती मिळाली. मग पोलिसांनी घरावर छापा टाकला आणि कासिमभाई हाजीभाई सोलंकी यांना अटक केली. तथापि, इतर दोन आरोपी, सतारभाई इस्माईलभाई सोलंकी आणि अक्रमभाई हाजीभाई सोलंकी हे पोलिसांना पाहताच पळून गेले. घटनास्थळी केलेल्या तपासात असे आढळून आले की, कत्तल केलेल्या प्राण्यांचे अवयव स्वयंपाकघरात पडले होते. घटनास्थळावरून गायीच्या शेपटीचे, कातडीचे आणि पायांचे तुकडेही जप्त करण्यात आले. घटनास्थळावरून प्लास्टिकच्या बादलीतील कचरा, गाय कापण्यासाठी वापरलेले शस्त्र आणि ४० किलो गोमांस जप्त करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी पीएसआय केएम परमार यांनी केली. अमरेली सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. खटला संपल्यानंतर सत्र न्यायाधीश रिजवानाबेन बुखारी यांनी आरोपी कासिमभाई हाजीभाई सोलंकी, सतारभाई इस्माईलभाई सोलंकी आणि अक्रमभाई हाजीभाई सोलंकी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या प्रत्येकाला ६,०८,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. चंद्रेश मेहता म्हणाले की, या निर्णयामुळे सुसंस्कृत समाज आणि प्राणीप्रेमींमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.