नवी दिल्ली – गुजरातचा विकासदर वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत 2023- 24 च्या मूल्यांकनानुसार गुजरातमधील दरडोई उत्पन्न तीन लाखाच्या पुढे गेले आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशासह इतर राज्यांना गुजरातने दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत मागे टाकले असल्याचे दिसून येते. गुजरात सरकारने यासंदर्भात जार केलेल्या माहितीत म्हटले आहे की, गुजरातचे दरडोई उत्पन्न आता 3 लाख 957 रुपये इतकी आहे. यामुळे गुजरात मधील मनुष्यबळाची उत्पादकता वाढली असल्याचे दिसून येते. 2023- 24 च्या मूल्यांकनुसार गुजरातचे एकूण उत्पन्न 24.62 लाख कोटी रुपये इतके भरले आहे. गेल्या दशकभरात केलेल्या वेगवान प्रगतीमुळे गुजरात आता महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या पुढारलेल्या राज्यांच्या रांगेत आले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सप्टेंबरअखेरच्या म्हणजे दुसर्या तिमाहीत भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 8.2% वाढले आहे. यामध्ये गुजरातचे योगदान वाढले आहे. भारताच्या विकासदरात जास्त प्रमाणात योगदान देणार्या राज्यामध्ये आता गुजरातचा क्रमांक लागला असल्याचे गुजरात सरकारने म्हटले आहे. 2012- 13 ते 2023 -24 या कालावधीत गुजरातचा सर्वसाधारण विकासदर प्रत्येक वर्षाला 8.42% इतका भरला आहे. या कालावधीत कर्नाटकचा विकासदर 7.69% तर तामिळनाडूचा विकासदर 6.19% इतका होता. गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या राज्याचे विकासदर मंदावले आहेत. मात्र गुजरातने विकास दराच्या वाढीतील योगदान कायम ठेवले आहे. गुजरातमध्ये गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर उद्योगासाठी पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये गुंतवणूक आणि दर्जेदार रोजगार वाढत असल्याचे गुजरात सरकारने म्हटले आहे. 2010-11 मध्ये गुजरातचे एकूण उत्पन्न 6.16 लाख कोटी रुपये होते. 2023 मध्ये हे उत्पन्नाच्या चारपटीने वाढून 24.62 लाख कोटी रुपये झाले आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राबरोबरच गुजरात मध्ये बांधकाम, रिअल इस्टेट क्षेत्रातील घडामोडी वेगाने वाढत आहेत. कृषी, मत्स्य उद्योग या क्षेत्राचे योगदान वाढत आहे. गुजरातच्या दरडोई उत्पन्नाची आकडेवारी सरकारने दिले असली तरी इतर राज्यांच्या दरडोई उत्पन्नाची आकडेवारी दिलेली नाही.