अहमदाबाद : मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरात मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करण्यात आला असून, या नव्या कॅबिनेटमध्ये हर्ष संघवी यांची राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महात्मा गांधी नगर येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात भूपेंद्र पटेल यांच्यासह एकूण २६ मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यामध्ये हर्ष संघवी यांचा समावेश आहे. हर्ष संघवी हे सूरतमधील मजुरा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार असून, ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे विश्वासू मानले जातात. वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून, गुजरात स्थापनेनंतर या पदावर विराजमान होणारे सर्वांत तरुण नेते ठरले आहेत. बालपण आणि राजकीय प्रवास हर्ष संघवी यांनी १५व्या वर्षी सामाजिक कार्यकर्ते म्हणून राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर आणि देशभर प्रवास करत युवकांमध्ये संघटनात्मक काम वाढवले. सन २०१२ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने विजय मिळवत गुजरातमधील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले उमेदवार ठरले. तेव्हा केवळ २७ वर्षांचे असताना ते राज्यातील सर्वात तरुण आमदार झाले होते. कामकाज आणि उपक्रम संघवी यांनी मंत्रीपदाच्या काळात गृहराज्य, क्रीडा, युवा व सांस्कृतिक विभागाचे कार्यभार सांभाळले आहेत. त्यांनी सूरतमध्ये ‘क्लीन तापी’ मोहिम, तसेच युवकांसाठी रोजगार मेळावे आणि सामाजिक उपक्रम राबवले आहेत. संघटनात्मक पातळीवर तरुणांना जोडण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांची प्रतिमा एक कुशल आणि ऊर्जावान नेते अशी बनली आहे. दक्षिण गुजरातला बळ त्यांच्या नियुक्तीमुळे दक्षिण गुजरातला मंत्रिमंडळात अधिक प्रतिनिधित्व मिळाले आहे. भाजपने नव्या कॅबिनेटमध्ये तरुण नेतृत्व आणि प्रादेशिक संतुलन या दोन्ही गोष्टींना प्राधान्य दिले आहे. उपमुख्यमंत्री पद गेल्या चार वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आले असून, याआधी हे पद नितीन पटेल यांनी विजय रुपाणी सरकारमध्ये भूषवले होते. नव्या मंत्रिमंडळात एकूण १९ नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये रिवाबा जाडेजा, भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जाडेजा यांच्या पत्नींचाही समावेश आहे. हर्ष संघवींच्या नेमणुकीमुळे भाजपने शहरी आणि युवा मतदारांमध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.