अहमदाबाद – गुजरातच्या बोटाड जिल्ह्यात गेल्या 12 तासांत आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याने बनावट दारूच्या सेवनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 40 वर पोहोचली आहे. मृतांपैकी 31 जण हे बोताडमधील वेगवेगळ्या गावातील असून नऊ जण अहमदाबाद जिल्ह्यातील शेजारील धंधुका तालुक्यातील मूळ रहिवासी आहेत, असे बोताड पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
भावनगर, बोताड आणि अहमदाबाद येथील रुग्णालयात अद्याप जवळपास 50 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात जटुभा राठोड नावाच्या इसमाला पकडण्यात आले आहे. त्याचा साथीदार मात्र अजून फरारी आहे. मिथाईल अल्कोहोल किंवा मिथेनॉल एका विषारी रसायनात मिसळून ही दारू तयार करण्यात आली होती अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
जयेश उर्फ राजू नावाच्या व्यक्तीने अहमदाबाद येथे एका गोडाऊनमधून 600 लिटर मिथाइल अल्कोहोल चोरून 25 जुलै रोजी त्याचा बोटाड येथील चुलत भाऊ संजय याला 40,000 रुपयांना विकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.