भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्यासाठी श्रीलंकेतून पाठवले ISIS चे 4 दहशतवादी, पाकिस्तानकडून मिळणार होते आदेश

Gujarat ISIS Terrorist Arrested Case Update: गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून 4 दहशतवादी पकडले गेले आहेत. ते मूळचे श्रीलंकेचे आहेत. या दहशतवाद्यांना अहमदाबादहून काही लक्ष्यित ठिकाणी पाठवले जाणार होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हे लोक पाकिस्तानच्या हँडलरच्या ऑर्डरची वाट पाहत होते. या दहशतवाद्यांना स्वतंत्रपणे शस्त्रेही पुरवली जाणार होती. या दहशतवाद्यांच्या फोनमधून एटीएसला एनक्रिप्टेड चॅट मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोहम्मद नुसरत (वय 33) , मोहम्मद फरीश (35) , मोहम्मद नफरन (27) आणि मोहम्मद रश्दीन (43) अशी या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.
गुजरात एटीएस ISIS च्या चार दहशतवाद्यांची सतत चौकशी करत आहे. मात्र 21 आणि 22 मे रोजी अहमदाबादमध्ये होणाऱ्या आयपीएल सामन्यांपूर्वी दहशतवाद्यांना पकडणे हे सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे आव्हान मानले जात आहे. सध्या या दहशतवाद्यांची सतत चौकशी सुरू आहे. या दहशतवाद्यांचा नेमका हेतू काय होता? याबाबत अद्याप नेमके काही सांगता येणार नाही. मात्र दहशतवाद्यांच्या अटकेनंतर पोलीस अधिकच सतर्क झाले आहेत.
Gujarat ATS arrested four ISIS terrorists at Ahmedabad airport.
All the four are citizens of Srilanka and were planning multiple terror attacks in India.
Their Names are
– Mohammad Nusrath
– Mohammad Faris
– Mohammad Rasdeen &
– Mohammad NafranEverytime they plan and our… pic.twitter.com/LGNn1lPQpa
— Sunanda Roy 👑 (@SaffronSunanda) May 20, 2024
अन्य कोणी दहशतवादी पोलिसांच्या नजरेतून सुटला का, त्याला स्थानिक हँडलरची मदत मिळाली का? यासाठी पोलिस सातत्याने काम करत आहेत. सध्या विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच पोलिसांना ईमेलद्वारे गुजरातमधील 16 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मोहीम राबवून शाळांची तपासणी केली. पोलिसांनी अनेक ठिकाणी अलर्ट जारी केला होता, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
दहशतवादी चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचले –
हे दहशतवादी याआधी इथे आले होते की नाही, याचीही माहिती मिळवण्याचा एटीएस प्रयत्न करत आहे. त्यांना स्थानिक कोण ओळखत होते? श्रीलंकन वंशाचे दहशतवादी आधी चेन्नईत आल्याचे सांगण्यात येत आहे. तेथून पुढे अहमदाबादला पोहोचले. यापूर्वी 6 मे रोजी अहमदाबादमधील 36 शाळांना बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यानंतर 12 मे रोजी अहमदाबाद विमानतळ उडवून देण्याची धमकीही देण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आले होते. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकृत ईमेल आयडीवर अज्ञात व्यक्तीने हा संदेश पाठवला असल्याचे पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी सांगितले होते.





