अहमदाबाद – गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज सकाळी एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील वालाणा गावात व्हॅन आणि टँकर यांच्यात झालेल्या धडकेत पाच जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वटामण ते भावनगरला जोडणाऱ्या रस्त्यावर पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला आहे. याप्रकरणी कोठ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, व्हॅनमध्ये आठ जण होते. हे सर्वजण आनंद जिल्ह्यातील खंभात येथे जात होते. रत्यावरून व्हॅन चुकीच्या बाजूने चालवली जात होती. वालाणा गावाजवळ एका टँकरने व्हॅनला धडक दिली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या अपघातात अन्य तिघे जखमी झाले आहेत. या अपघातासंदर्भात अधिकाऱ्याने सांगितले की, टक्कर इतकी जोरदार होती की अपघात झालेल्या व्हॅनमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी काही तास लागले. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश असून तीन जखमींवर खंभात येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे.