शाळेत श्रमदान करून बच्चू कडूंनी उभारली श्रमदानाची “गुढी’

अमरावती – “चला शाळेमध्ये श्रमदान करू, शैक्षणिक समानतेची गुढी उभारू’ असा संदेश देत शालेय शिक्षण, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी गुढीपाडव्याला बेलोरा येथील जि. प. शाळेत श्रमदान केले.
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी बेलोरा येथील जि. प. शाळेत अनेक कार्यकर्त्यांसह श्रमदान केले. यावेळी शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. राज्यमंत्र्यांनी स्वत: अथकपणे परिश्रम करून सहभागी नागरिकांना श्रमदानासाठी प्रोत्साहित केले. शाळेच्या परिसरातील कचरा हटवून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला.
शिक्षणातील विषमता संपवणे आवश्यक आहे. समाजातील गरीब, वंचित, कष्टकरी, शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांनाही चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त शैक्षणिक समतेची गुढी उभारण्याचा संकल्प केला आहे, असे प्रतिपादन कडू यांनी यावेळी केली.
कडू म्हणाले, या उपक्रमाद्वारे शाळांची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मी या शाळेत शिकलो. शाळेच्या स्मृती मनात कायम आहेत. केवळ बेलो-यापुरते नव्हे, तर राहुटी उपक्रमाच्या धर्तीवर दर पंधरवड्याला हा उपक्रम विविध गावांतील शाळांत राबवू. दुर्लक्षित भागातील शाळांचे रूप पालटण्यात येईल. तिथे आवश्यक त्या सुविधा उभारण्याचा प्रयत्न राहील. या उपक्रमाची मुहुर्तमेढ गुढीपाडव्यानिमित्त करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.




