GTA 6: GTA 6 चा जगभरात बोलबाला! लॉन्चपूर्वीच १४ हजार कोटींची कमाई; गेमच्या निर्मितीत भारताचाही मोठा वाटा?
GTA 6 GTA 6 ची चर्चा केवळ कमाईमुळेच नाही, तर त्याच्या निर्मितीसाठी करण्यात आलेल्या खर्चामुळेही होत आहे. रॉकस्टार गेम्स आणि टेक-टू इंटरअॅक्टिव्ह या कंपन्यांनी अद्याप गेमचे अधिकृत बजेट जाहीर केलेले नाही. मात्र, इंडस्ट्रीतील अंदाजानुसार हा गेम तयार करण्यासाठी १ ते २ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास ९ हजार ४०० कोटी ते १८ हजार ८०० कोटी रुपये खर्च झाले असावेत.

GTA 6: जगभरातील गेमर्स गेल्या अनेक वर्षांपासून ज्या गेमची आतुरतेने वाट पाहत होते, तो ‘ग्रँड थेफ्ट ऑटो ६’ (GTA 6) अखेर १९ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित झाला आहे. तब्बल १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या गेमची नवी आवृत्ती आल्याने गेमिंग विश्वात उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष लॉन्च होण्यापूर्वीच या गेमने कमाईचे अनेक विक्रम मोडल्याचा दावा केला जात आहे. प्री-ऑर्डरमधून या गेमने जवळपास १४ हजार १०० कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या गेमची तुलना थेट हॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांशी केली जात आहे. या गेमच्या निर्मितीमध्ये भारताचाही सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे.
लॉन्चपूर्वीच १४ हजार कोटींची कमाई (GTA 6)
‘GTA 6’ हा सध्या जगातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या व्हिडीओ गेम्सपैकी एक आहे. मार्केट इंटेलिजन्स कंपनी सेन्सर टॉवरच्या आकडेवारीनुसार, गेमला लॉन्चपूर्वीच सुमारे १.५ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास १४ हजार १०० कोटी रुपयांचे प्री-ऑर्डर मिळाले आहेत. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अॅव्हेंजर्स : एंडगेम’ या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये जगभरात सुमारे १.२ अब्ज डॉलरची कमाई केली होती. GTA 6 ने प्री-ऑर्डरमधूनच हा आकडा ओलांडल्याचे सांगितले जात आहे.
गेमच्या निर्मितीसाठी खर्च झाले १८ हजार कोटी? (GTA 6)
GTA 6 ची चर्चा केवळ कमाईमुळेच नाही, तर त्याच्या निर्मितीसाठी करण्यात आलेल्या खर्चामुळेही होत आहे. रॉकस्टार गेम्स आणि टेक-टू इंटरअॅक्टिव्ह या कंपन्यांनी अद्याप गेमचे अधिकृत बजेट जाहीर केलेले नाही. मात्र, इंडस्ट्रीतील अंदाजानुसार हा गेम तयार करण्यासाठी १ ते २ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास ९ हजार ४०० कोटी ते १८ हजार ८०० कोटी रुपये खर्च झाले असावेत.
हा अंदाज खरा ठरल्यास GTA 6 हा आतापर्यंतचा सर्वाधिक खर्चिक व्हिडीओ गेम ठरू शकतो. अनेक मोठ्या हॉलिवूड चित्रपटांच्या निर्मितीचा खर्चही यापेक्षा कमी असल्याचे सांगितले जाते. या वर्षाच्या अखेरपर्यंत गेमची कमाई ३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

Grand Theft Auto 6 released after 13-year
पहिल्यांदाच महिला मुख्य भूमिकेत
GTA मालिकेच्या नव्या भागात यावेळी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या गेममध्ये लूसिया आणि जेसन हे दोन मुख्य पात्र आहेत. विशेष म्हणजे, लूसिया ही GTA मालिकेच्या आधुनिक काळातील पहिली महिला मुख्य पात्र आहे. या दोघांची कथा ‘लिओनिडा’ या काल्पनिक प्रदेशात घडते. हा प्रदेश अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यापासून प्रेरित आहे.
गेममध्ये सोशल मीडिया, इन्फ्लुएन्सर संस्कृती, गुन्हेगारी आणि अमेरिकेतील सेलिब्रिटींच्या जीवनशैलीवर भाष्य करण्यात आले आहे. रॉकस्टारच्या मते, या भागातील गेमची दुनिया यापूर्वीच्या आवृत्त्यांपेक्षा अधिक मोठी आणि वास्तववादी आहे.
GTA 6 च्या निर्मितीत भारताचा सहभाग?
या गेमशी भारताचेही एक खास नाते असल्याची चर्चा आहे. बंगळुरूमध्ये असलेले रॉकस्टार इंडिया स्टुडिओ या गेमच्या जागतिक निर्मिती प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. २०१९ मध्ये भारतीय गेम डेव्हलपमेंट कंपनी ध्रुव इंटरअॅक्टिव्हच्या अधिग्रहणानंतर या स्टुडिओची उभारणी करण्यात आली होती.
भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत GTA 6 च्या निर्मितीतील मोठा भाग भारतात तयार झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रॉकस्टारच्या भारतातील सुमारे १,६०० डेव्हलपर्सनी या गेमच्या निर्मितीत योगदान दिले आहे. मात्र, या दाव्याबाबत रॉकस्टारकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वी ‘रेड डेड रिडेम्प्शन २’ या गेमच्या क्रेडिट्समध्येही भारतीय टीममधील सदस्यांची नावे होती.
५० तासांत पूर्ण होणार गेमची मुख्य कथा
GTA 6 चा पहिला ट्रेलर डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. सुरुवातीला हा गेम २०२५ मध्ये लॉन्च होणार होता. मात्र, त्यानंतर दोन वेळा त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. अखेर १९ नोव्हेंबर २०२६ रोजी गेम प्रदर्शित झाला. या गेमची मुख्य कथा पूर्ण करण्यासाठी साधारण ५० तास लागतील, असा अंदाज आहे.
तब्बल १३ वर्षांनंतर GTA मालिकेचा नवा भाग आल्याने गेमर्समध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे आगामी काळात हा गेम कमाईचे आणखी कोणते विक्रम प्रस्थापित करतो, याकडे संपूर्ण गेमिंग विश्वाचे लक्ष लागले आहे.





