कोलकत्ता – केंद्र सरकार व आणि राज्य सरकारने समन्वयाने जवळजवळ 400 वस्तूंवरील वस्तू आणि सेवाकरात म्हणजे जीएसटीत भरघोस कपात केली आहे. मात्र तरीही यामुळे एकूण जीएसटी संकलनावर जास्त परिणाम होणार नाही. केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची तूट यामुळे वाढणार नाही असे मत बर्याच पतमानांकन संस्थांनी व्यक्त केले आहे. आता क्रिसिल या संस्थेने सांगितले की कर कपातीमुळे महसुलावर जास्त परिणाम होणार नाही. यासंदर्भात या संस्थेने जारी केलेल्या टिपणात म्हटले आहे की, सरलेल्या आर्थिक वर्षात एकूण जीएसटी संकलन 10.6 लाख कोटी रुपये होते. अर्थ मंत्रालयाने स्वतः केलेल्या मूल्यांकनानुसार चालू आर्थिक वर्षात कर कपातीमुळे जीएसटी संकलनावर 48 हजार कोटी रुपयांचा परिणाम होऊ शकतो. जरी ही आकडेवारी गृहीत धरली तरी 10.6 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 48 हजार कोटी ही रक्कम अत्यल्प आहे. शिवाय किमती कमी झाल्यामुळे विक्री वाढून जीएसटी संकलनात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता खुली आहे. प्राप्तिकर उत्पन्न मर्यादित झालेली वाढ आणि विविध वस्तू आणि सेवा वरील कमी झालेला कर यामुळे नागरिकाकडील अतिरिक्त उत्पन्न वाढेल. त्यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढेल. अशा परिस्थितीत जीएसटी संकलन वाढण्यास मदत होणार आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत त्याचे अचूक मूल्यांकन केले जाऊ शकणार नाही. मोबाईल टेरिफसारख्या वेगाने वाढणार्या सेवावरील कराच्या दरात बदल केलेला नाही. त्याचबरोबर ई-कॉमर्स डिलिव्हरी सारख्या सेवावर आता अठरा टक्के इतका कर लावण्यात आलेला आहे. त्यामुळे कर संकलनातील तूट भरून निघण्यास मदत होणार आहे. कराचे जास्त टप्पे असल्यामुळे गुंतागुंत वाढत होती .आता चार पैकी दोन टप्पे रद्द करण्यात आलेले आहेत. त्यामुळे विविध उद्योग आणि सेवा क्षेत्रांना कर भरणे सोपे जाणार आहेत. त्याचबरोबर बरेच नवे उद्योग औपचारिक क्षेत्रात येऊन कर भरू शकणार असल्याचे सांगण्यात आले. कोणत्या टप्प्यातून किती कर या अगोदर 18% कराच्या टप्प्यातून 70 ते 75 टक्के इतका महसूल मिळत होता. त्या टप्प्यावर जास्त परिणाम झालेला नाही. 12 टक्के करायच्या टप्प्यातून फक्त 5 % आणि 28% कराच्या टप्प्यातून फक्त 13 ते 15 टक्के इतका महसूल जमा होत होता. आता 12 आणि 28% टप्पे रद्द झाल्यामुळे आणि यातील काही बाबी 18% आणि काही बाबी 5% वर आल्या आहेत. त्यामुळे जीएसटी संकलनावर जास्त परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. उलट कराच्या सुसूत्रीकरणामुळे कर संकलन वाढेल. त्याचबरोबर अनौपचारिक क्षेत्रातील बरेच उद्योग या क्षेत्रात येण्यास मदत होईल.