मुंबई – जीएसटी सुधारणा अंतर्गत साडेतीनशे वस्तूंवरील जीएसटी कपात करण्यात आली आहे. मात्र एवढ्यामुळे खासगी क्षेत्र गुंतवणुकीसाठी पुढाकार घेणार नाही. याकरिता 1990 मध्ये पी व्ही नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी ज्या प्रकारच्या बिगबँग सुधारणा केल्या होत्या, तशा प्रकारच्या सुधारणांची गरज असल्याचे मत गोदरेज एंटरप्राइजेस समूहाचे अध्यक्ष जमशेद गोदरेज यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, अनेक क्षेत्रात अजूनही नियंत्रणे आहेत. ते नियंत्रणे दूर करून उद्योग करण्यास सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी सुधारणांची आवश्यकता आहे. गोदरेज इंटेरिओचे रिब्रॅण्डिंग केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ही कंपनी आपला महसूल नजीकच्या भविष्यात 3,500 कोटी रुपयांवरून 10 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविणार आहे. जीएसटी कपाती बाबत बोलताना गोदरेज म्हणाले की, ती फक्त सुसूत्रता आहे. ती अगोदरच करणे अपेक्षित होते. मात्र यामुळे कंपन्यांची भांडवली गुंतवणूक वाढणार नाही. प्राप्तिकार उत्पन्न मर्यादेचा परिणाम नाही अर्थसंकल्पात प्राप्तिकर उत्पन्न मर्यादा 12 लाखापर्यंत वाढविली असली तरी नागरिकांनी खर्च टाळून आपल्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे, असे गोदरेज म्हणाले. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या सवलतीमुळे कंपन्या विस्तारीकरणाचे काम हाती घेणार नाहीत. त्यासाठी मोठ्या सुधारणा करण्याची गरज आहे. भारतामध्ये अनेक क्षेत्रात अजूनही परवान्यासाठी बराच वेळ लागतो. अशा परिस्थितीत देशातील आणि परदेशातील कंपन्या गुंतवणुकीसाठी पुढाकार घेत नसतात.