GST कपातीने उत्सवी खरेदीला बूस्ट! ई-कॉमर्स सेलमध्ये 25% वाढ, छोट्या शहरांतून रेकॉर्ड मागणी

नवी दिल्ली – भारतातील उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जीएसटी परिषदेने विविध वस्तूच्या जीएसटीत बरीच कपात जाहीर केली आहे. दरम्यानच्या काळामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांनी आपले सेल सुरू केले आहेत. याला 23 ते 25 टक्के जास्त प्रतिसाद मिळत असल्याचेही कॉमर्स कंपन्यांच्या अधिकार्यांनी नमूद केले.
मोठ्या आकाराचे टीव्ही, फॅशन वस्तू, फर्निचर इत्यादीसाठी ग्राहकांकडून जास्त मागणी येत असल्याचे सांगण्यात आले. मुळात वर्षाच्या या कालावधीमध्ये कंपन्या आणि ई -कॉमर्स कंपन्या विविध वस्तूवर बरीच सूट जाहीर करत असतात. त्यातच जीएसटी कपात झाली आहे. अशा कारणामुळे मागणीत जास्तच वाढ होत असल्याचे बाजार संशोधन करणार्या रेडशिर कंपनीने म्हटले आहे.
मोठ्या आकाराच्या टीव्हीवरील जीएसटी 28 टक्क्यावरून 18 टक्के इतका करण्यात आला आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किमती सहा ते आठ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तर कपडे आणि इतर वस्तूवरील जीएसटी केवळ पाच टक्के इतका करण्यात आलेला आहे. त्यामुळे कपड्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. फर्निचरवरील जीएसटी ही कमी करून पाच टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे फर्निचरची मागणी वाढत आहे.
विक्री सुरू झाल्यापासून पहिल्या दोन दिवसांमध्ये या वस्तूंच्या विक्रीत 23 ते 25 टक्के वाढ झाली असल्याचे सांगितले जाते. उत्सवाचे वातावरण असतानाच या वस्तूच्या किमती कमी झाल्यामुळे ग्राहक सुखावले आहेत असे समजले जाते.
सुरुवातीच्या काळामध्ये मागणीचा इतका जोर होता की काही ई-कॉमर्स कंपन्यांच्या अॅपवर जास्त ट्रॅफिक मुळे परिणाम झाला असल्याचे सांगितले जाते. अॅमेझॉन कंपनीने सांगितले की, पहिल्या दोन दिवसांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आमच्याकडे जास्त ग्राहकांची मागणी नोंदले गेली. या दोन दिवसात 38 कोटी ग्राहकांनी वेबसाईटला भेट दिली.
छोट्या शहरांतून जास्त मागणी –
शक्यतो ई-कॉमर्समध्ये मेट्रो शहरातून जास्त मागणी असते. मात्र यावेळी छोट्या शहरातूनही जास्त मागणी आली आहे. अॅमेझॉन कंपनीने सांगितले की पहिल्या दोन दिवसात आमच्याकडे 38 कोटी ग्राहकांनी विचारणा केली. त्यातील 70 टक्के ग्राहक हे छोट्या शहरातील आहेत. आगामी काळात उत्सवाचे वातावरण आणखी वाढणार आहे. त्यामुळे या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. स्नॅपडील, फ्लिपकार्ट या कंपन्यांनी असेच निरीक्षण नोंदविले आहे.

