नवी दिल्ली – डिसेंबर महिन्यात वार्षिक पातळीवर जीएसटी संकलनात 7.3% वाढ होऊन हे संकलन 1.77 लाख कोटी रुपयांवर गेले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये 1.65 लाख कोटी रुपयांच कर संकलन झाले होते. डिसेंबर महिन्यामध्ये देशांतर्गत व्यवहारातून झालेले जीएसटी संकलन 8.4 टक्क्यांनी वाढून 1.32 लाख कोटी रुपये झाले आहे. तर आयातीवरील जीएसटी संकलनात 4 टक्क्यांची वाढ होऊन हे संकलन 44,268 कोटी रुपये झाले आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये जीएसटी संकलन 8.5 टक्क्यांनी वाढून 1.82 लाख कोटी रुपये झाले होते. म्हणजे मासिक पातळीवर जीएसटी संकलनात घट झाली आहे. एप्रिल 2024 मध्ये सर्वात जास्त म्हणजे 2.10 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. डिसेंबर महिन्यामध्ये करदात्यांना 22,490 कोटी रुपयांचा परतावा दिला. त्यामुळे निव्वळकर संकलन 3.3 टक्क्यांनी वाढून 1.54 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. आता झालेल्या कर संकलनात केंद्र सरकारचा जीएसटी 32,836 कोटी रुपये, राज्य सरकारचा जीएसटी 40,499 कोटी रुपये, संयुक्त जीएसटी 47,783 कोटी रुपये तर अधिभार 11 471 कोटी रुपयाचा आहे. एकूण जीएसटी कर संकलन समाधानकारक आहे. मात्र तरीही करदात्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्याचबरोबर कराचा आणखी एक टप्पा सुरू करण्यावर जयसरमेल येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. हा टप्प्पा वाढू नये असे कर तज्ञांनी सरकारला सांगितले आहे. दरम्यान जीएसटी कर संकलनाबरोबरच प्राप्तिकर संकलनही वाढत आहे. अशा परिस्थितीत यावर्षी सरकारचे तूट ठरविल्यापेक्षा बरीच कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण कर संकलन वाढत असले तरी सरकारचा खर्च उद्दिष्टाइतका झालेला नाही.