नवी दिल्ली – फेब्रुवारी महिन्यात जीएसटी संकलन 9.1 टक्क्यांनी वाढून 1.84 लाख कोटी रुपये झाले आहे. तिसर्या तिमाहित विकासदराची आशादायक आकडेवारी परवाच जाहीर झाली असताना फेब्रुवारी महिन्यात कर संकलन वाढले आहे. त्यामुळे आगामी काळात कर संकलन आणि विकास दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे देशांतर्गत व्यवहाराबरोबरच परदेशात झालेल्या व्यवहारावरील जीएसटी संकलनातही वाढ झाली आहे. जागतिक परिस्थिती खराब असताना परदेशी व्यवहारातून कर संकलन वाढल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कर संकलन विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये देशांतर्गत व्यवहारावरील कर संकलन 10.2% वाढून 1.42 लाख कोटी रुपये झाले आहे. तर परदेशातील व्यवहारावरील जीएसटी संकलन 5.4 टक्क्यांनी वाढून 41,702 कोटी रुपये झाले आहे. एकात्मिक जीएसटी संकलन 90,870 कोटी रुपये तर अधिभार संकलन 13,868 कोटी रुपये झाले आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये परतावा 17.3 टक्क्यांनी वाढून 20,889 कोटी रुपये झाला आहे. त्यामुळे निव्वळ कर संकलन 8.1 टक्क्यांनी वाढून 1.63 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये ढोबळ कर संकलन 1.68 लाख कोटी रुपये होते तर निव्वळ जीएसटी कर संकलन 1.50 लाख कोटी रुपये होते.