नवी दिल्ली – जीएसटी सुधारणांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. वस्तूवरील जीएसटी कपातीमुळे कर संकलन कमी होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र प्रत्यक्षात सप्टेंबर महिन्यामध्ये विक्री वाढल्यामुळे जीएसटी संकलन गेल्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यापेक्षा 9.1 टक्क्यांनी वाढून तब्बल 1.89 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. त्यामुळे जीएसटी सुधारणाचा प्रयोग यशस्वी झाला असल्याचे दिसून येत असल्याचे काही व्यापार्यांनी नमूद केले. 22 सप्टेंबर साडेतीनशे वस्तूंच्या दरात कपात करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला होता. यामुळे वार्षिक पातळीवर जीएसटी संकलनावर 48,000 कोटी रुपयांचा नकारात्मक परिणाम होणार असल्याचे स्वतः अर्थ मंत्रालयाने सुचित केले होते. मात्र प्रत्यक्षात आठ दिवसांमध्ये विविध वस्तूंच्या विक्रीत कमी जीएसटी दरामुळे वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत जीएसटी दर कमी झाला असला तरी एकूणच वस्तूची विक्री वाढल्यामुळे जीएसटी संकलनात वाढ झाली असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. विशेष म्हणजे मासिक पातळीवरही जीएसटी संकलन 1.5 टक्क्यानी वाढले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये 1.73 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. तर ऑगस्ट महिन्यात 1.86 लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते. 22 सप्टेंबर पर्यंत ग्राहकांनी खरेदी टाळली. मात्र 22 सप्टेंबर टाळलेली खरेदी मोठ्या प्रमाणात केली असे काही व्यापार्यांनी सांगितले. जर जीएसटी कपातीमुळे सप्टेंबर महिन्यामध्ये जीएसटी संकलन वाढले असेल तर ऑक्टोबर महिन्यातही जीएसटी संकलन मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता खुली झाली आहे. सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत कर संकलन 6.8 टक्क्यांनी वाढून 1.36 लाख कोटी रुपये झाले आहे. आयातीतून झालेले कर संकलन 15.6 टक्क्यांनी वाढून 22,492 कोटी रुपये झाले आहे. मात्र जीएसटी परतावा 40.1 टक्क्यांनी वाढून 28, 657 कोटी रुपये इतका झाला आहे. त्यामुळे निव्वळ जीएसटी संकलन 1.6 लाख कोटी रुपये झाले आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेले निव्वळ कर संकलन पाच टक्क्यांनी जास्त आहे.